स्वावलंबी

नाही आवडत तुला
माझं कोणावर अवलंबून राहणं
माहीत आहे मला

आणि म्हणूनच भीती वाटते

इतकंही स्वावलंबी नको करू मला
की उद्या तुझीही गरज नाही भासणार …

—————-

माझी सैन्यगाथा (भाग २९)

सृष्टीच्या पहिल्या वाढदिवसानंतर डिसेंबर मधे (ऐश्वर्या च्या ख्रिसमसच्या सुट्टीत) आम्ही तिघी थोड्या दिवसांकरता राजौरीला राहायला गेलो. तोपर्यंत तिथली परिस्थिती बरीचशी निवळली असल्यामुळे काही दिवसांकरता आम्हांला (आणि आमच्यासारख्याच इतर परिवारांना) तिकडे जायची परवानगी देण्यात आली होती. जम्मू ते राजौरी हा प्रवास माझ्यासाठी जरी खूप नयनरम्य असला तरी माझ्या दोघी मुलींसाठी खूपच त्रासदायक ठरला आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे ते डोंगरातले नागमोडी रस्ते आणि चढ उतार….त्या दोघींनाही मोशन सिकनेस असल्यामुळे राजौरीला पोचेपर्यंत त्यांची हालत खूपच खराब झाली होती. पण एकदा तिथे पोचल्यावर जेव्हा त्यांनी (खास करून ऐश्वर्या नी) त्यांच्या बाबांना बघितलं ना, तेव्हा प्रवासाचा सगळा शीण कुठल्या कुठे पळून गेला.
तिथली परिस्थिती जरी सामान्य झाली असली तरी आम्हां परिवारजनांना काही बंधनं पाळणं अनिवार्य होतं.आम्हांला कॅन्टोन्मेंट एरिया च्या बाहेर जायची परवानगी नव्हती. जर कधी काही कामानिमित्त मुख्य गावात किंवा तिथल्या बाजारात जायचं असेल तर सुरक्षेसाठी हत्यारबंद सैनिक बरोबर असायचे. पण हा सगळा द्राविडी प्राणायाम टाळण्यासाठी म्हणून आम्ही फारसे बाहेर पडायचोच नाही. हे जेव्हा नंतर माझ्या एका कॉलेजच्या मैत्रिणीला कळलं तेव्हा तिला इतकं आश्चर्य वाटलं होतं… ती मला म्हणाली,” हे काय, म्हणजे जवळजवळ महिनाभर तुम्ही तुमच्या कॉलनीबाहेर पडलाच नाहीत? कंटाळा नाही आला का तुम्हांला अशा बंदिस्त वातावरणात ?” तिच्या पामर बुद्धीला मनातल्या मनात क्षमा करत मी म्हणाले,” आम्हांला इतके दिवस तिथे नितीन बरोबर राहायला मिळालं यातच आम्ही खुश होतो..आणि आम्ही काही तिकडे sight seeing किंवा शॉपिंग करायला नव्हतो गेलो. ज्या कारणासाठी गेलो होतो ते कारण साध्य झालं….बस्, मग अजून काय पाहिजे ? ”
तसंही तिथे आम्ही फक्त २०-२५ दिवसच राहणार असल्यामुळे जास्तीत जास्त वेळ आम्ही चौघांनी एकत्र घालवायचं ठरवलं होतं. रोज संध्याकाळी नितीन ऐश्वर्या ला घेऊन त्याचा evening walk करायला जायचा. तीही अगदी आवडीनी जायची त्याच्या बरोबर. त्या अर्ध्या पाऊण तासात खूप गप्पा व्हायच्या दोघांच्या .. तसं पाहता खरं म्हणजे नितीनचा चालण्याचा स्पीड खूप जास्त आहे. आमच्या लग्नानंतर सुरुवातीला (आगरतला ला असताना) एक दोन वेळा मी त्याच्या बरोबर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, पण त्याच्याबरोबर चालायचं म्हणजे मला अक्षरशः पळायला लागत होतं..त्यामुळे त्यानंतर आजपर्यंत परत ती चूक केली नाही. पण ऐश्वर्या बरोबर असताना मात्र तो अगदी हळू, तिच्या स्पीड नी चालायचा… मला -“जरा स्पीड वाढव ना तुझा”- असं म्हणणारा माझा नवरा आमच्या मुलीबरोबर मात्र अगदी सावकाश , तिच्या स्पीडनी चालायचा!
राजौरी मधले ते मंतरलेले दिवस बघता बघता उडून गेले . त्या काही दिवसांत आम्ही आमचा एकत्र राहण्याचा आधीचा बॅकलॉग क्लिअर करून घेतला. सृष्टीच्या पहिल्या वाढदिवसाला नितीन येऊ शकला नव्हता म्हणून मग आम्ही चौघांनी परत एकदा तिचा वाढदिवस साजरा केला. तिथल्या इतर ऑफिसर्स आणि त्यांच्या परिवारांबरोबर नवीन वर्षाचं स्वागत केलं.
आता आमचा तिघींचा पुन्हा जम्मूला जायचा दिवस जवळ येऊन ठेपला होता. मी आठवड्याभरा पासूनच दोघी मुलींना त्या दृष्टीनी मानसिकरित्या तयार करत होते.. त्यामागचा हेतू एकच- त्यांच्या बाबांना सोडून जाताना त्यांना जास्त अवघड जायला नको.
ठरलेल्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही तिघींनी राजौरीला रामराम ठोकला आणि पुन्हा जम्मूच्या दिशेनी प्रस्थान ठेवलं. आदल्या रात्री दोघी मुली त्यांच्या बाबांशी खूप उशिरापर्यंत खेळत, गप्पा मारत जाग्या होत्या; त्यामुळे प्रवास सुरु झाल्यावर थोड्याच वेळात दोघींची विकेट पडली. पण मला प्रवासात फारशी झोप येत नाही- आणि प्रवास जर दिवसाचा असेल तर मग झोपण्याचा प्रश्नच उद्भवत नाही – कारण मला अशा वेळी बाहेर रस्त्यावर दिसणारी दृश्यं बघायला खूप आवडतं. कोसा कोसावर बदलत जाणारी माती, झाडं झुडुपं, घरांची बदलत जाणारी रचना, लोकांची वेशभूषा – सगळं किती इंटरेस्टिंग वाटतं ! आपल्या देशात आढळून येणारी ही विविधता मला नेहेमीच खूप अद्भुत वाटते.
तर सांगायचा मुद्दा हा की त्या दिवशी सुद्धा मी प्रवासात जागीच होते आणि गाडीच्या खिडकीतून बाहेरची दृश्यं बघत होते. डोंगर दऱ्या कापत जाणारा रस्ता…साहजिकच दोन्ही बाजूला निसर्गाची, भूमातेची विविध रूपं डोळ्यांसमोरून धावत होती..कधी छोट्या-मोठ्या टेकड्या तर कधी हिरवीगार कुरणं !जसजसा दिवस वर येऊ लागला तशीतशी रस्त्यांवर तिथल्या स्थानीय गावकऱ्यांची, शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींची वर्दळ वाढायला लागली.
तेव्हाची नाजूक परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीनी प्रत्येक मिलिटरी च्या गाडी बरोबर एक हत्यारबंद गाडी तैनात असायची. या नियमानुसार अर्थातच आमच्या गाडीच्या पुढे देखील एक हत्यारबंद गाडी होतीच. आणि गंमत म्हणजे रस्त्यावरून येणारी जाणारी छोटी छोटी मुलं आमच्या गाड्या बघून जागेवरच उभी राहून आम्हांला सॅल्युट ठोकायची…एकानी सुरू केलं की मग काय – त्याच्या बरोबरची सगळीच मुलं ‘ एक साथ सॅल्युट’ करायची ! त्यांचा तो खोडकर उत्साह बघून खूप मजा येत होती.
मधे सुंदरबनी ला एक चहाचा ब्रेक घेऊन आम्ही पुढे निघालो आणि दुपारी साधारण दीड दोन च्या सुमाराला जम्मूला आमच्या घरी पोचलो.
ओळखीचा परिसर आणि सवयीची जागा दिसल्यामुळे सृष्टी खूप खुश झाली. गाडीतून आम्ही बाहेर निघाल्या निघाल्या लगेच माझ्या कडेवरून खाली उतरून घराच्या दारापाशी जाऊन पोचली सुद्धा. घराचं मुख्य लाकडी दार उघडून आत गेल्या गेल्या मी क्षणभर थबकले. माझं लक्ष व्हरांड्यात ठेवलेल्या डोअर मॅट वर गेलं. त्याच्यावर मला काहीतरी हलताना दिसलं. आधी सृष्टीला उचलून कडेवर घेतलं आणि तिला घराबाहेर नेत ऐश्वर्या बरोबर बाहेरच थांबायला सांगितलं. दोन पावलं पुढे होऊन जरा नीट निरीक्षण केलं तेव्हा लक्षात आलं की ते एका भल्यामोठ्या झुरळाचे पंख होते. पण माझ्या घरातल्या झुरळांचा तर मी केव्हाच नायनाट केला होता. ‘अरे देवा, म्हणजे मागच्या महिन्याभरात मी नाही असं बघून या शत्रूनी परत एन्ट्री घेतली की काय घरात? पण मग इथे जर नुसते त्याचे पंखच दिसतायत याचाच अर्थ कोणीतरी त्या जीवाला मारून खाल्लं असावं….पण कोणी ? साप ?? छे, साप असं selective जेवण का करेल! मग कोण ? बेडूक?? पण मी तरी तोपर्यंत कोणत्याही बेडकाला कधी पंख सोडून नुसतं झुरळ खाताना पाहिलं नव्हतं…त्यामुळे बेडूक ही लिस्ट मधून आऊट झाला…मग कोण? विंचू??? हं, शक्यता नाकारता येत नव्हती. पण मग आता हा विंचू कुठे आणि कसा शोधायचा ?” काही क्षणांत इतके सगळे विचार येऊन गेले माझ्या मनात ! बाहेरून ऐश्वर्या आणि सृष्टी आत यायची घाई करत होत्या. त्यांना परिस्थितीची थोडीशी कल्पना देत अजून थोडा वेळ थांबायला सांगितलं आणि माझा मोर्चा पुन्हा त्या crime scene कडे वळवला. ‘जिथे पुरावा मिळालाय तिथूनच तपास सुरू करावा,’ असा विचार करत मी समोरच्या shoe rack मधून माझी एक चप्पल हातात घेतली आणि एका बाजूनी हळूच ते डोअर मॅट उचलून धरलं… बघते तर काय – त्याच्याखालून एक भला मोठा विंचू निघाला आणि दाराच्या म्हणजेच पर्यायानी माझ्या दिशेनी धावायला लागला. मी पण पूर्ण तयारीतच होते. त्याला काही कळायच्या आत मी चप्पलच्या एका फटक्यात त्याला तिथेच गारद केलं. आत जाऊन सगळ्या घरात खाली वाकून वाकून जिथे नजर पोचत होती तिथपर्यंतची जमीन चेक करून खात्री करून घेतली आणि मग मुलींना आत बोलावलं. नंतर जेव्हा त्या धारातीर्थी पडलेल्या विंचवाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला केरभरणीत उचलून घेतलं तेव्हा त्याचा खरा आकार लक्षात आला… बराच लांब आणि मोठा होता तो- जवळजवळ सहा सात इंच तरी असेल! क्षणभर मनात चर्र् झालं…..रोज दुपारी ऐश्वर्याची वाट बघताना सृष्टी जिथे उभी असायची बरोब्बर त्याच जागी तो विंचूही दबा धरून बसला होता. वेळीच लक्षात आल्यामुळे पुढे येणारं संभाव्य संकट टळलं होतं !
क्रमशः

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,

आजपर्यंत तुम्ही माझ्या सैन्यगाथेचं खूप कौतुक केलंत. प्रत्येक वेळी अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात. तुम्हां सगळ्यांबरोबर मी माझ्या या सैनिकी प्रवासातला प्रत्येक दिवस, प्रत्येक अनुभव पुन्हा नव्यानी जगले. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सुचवल्याप्रमाणे आता लवकरच माझी ही सैन्यगाथा मी पुस्तक रुपात तुमच्या समक्ष घेऊन येते आहे.

तेव्हा आता यापुढील (शेवटचे काही) भाग पुस्तकात वाचायला विसरू नका.

तुमचं प्रोत्साहन आणि प्रेम असंच सतत लाभत राहील आणि मला अजून लिहायची प्रेरणा देईल याबद्दल खात्री आहे मला !

तुम्हां सर्वांचे अगदी मनापासून आभार !!!

परीची दुनिया (भाग ७)

थोड्या वेळानंतर परीचे बाबा आले – परीला आणि तिच्या आईला घरी घेऊन जायला ! आई तर खूपच खुशीत होती. आणि आई खुश त्यामुळे परी पण खुश!! शेवटी एकदाची परीराणीची स्वारी आई बाबांबरोबर घरी जाऊन पोचली. दारातच तिला आजी उभी असलेली दिसली…अजून पण खूप लोक होते तिथे – सगळे परीच्या घरात येण्याचीच वाट बघत होते. आजी आईला म्हणाली,” थांब जरा बाहेरच , आधी दृष्ट काढते, मग औक्षण करते .. आणि मग आण तिला घरात ; लक्ष्मी आलीये आपल्या घरी!” आजीचं बोलणं ऐकून आईच्या चेहेऱ्यावर समाधान दिसलं परीला. पण खरं तर तिला आता हळूहळू भूक लागायला सुरुवात झाली होती….’ लावावा का आपला टँ चा सूर ?’ परीच्या मनात आलं; पण तेवढ्यात तिचं लक्ष आजीकडे गेलं…’असं काय करतीये आजी? नुसतेच गोल गोल हात का फिरवतीये हवेत ? आणि हळू आवाजात काहीतरी म्हणते पण आहे !’ तेवढ्यात आजी म्हणाली,” झाली बाई दृष्ट काढून- आता औक्षण!” परी पुन्हा नीट लक्ष देऊन बघायला लागली. किती नवीन नवीन शब्द ऐकू येत होते तिला.. ‘अच्छा, म्हणजे ते गोल गोल हात फिरवणं म्हणजे दृष्ट होय! पण आता परत आजी काहीतरी गोल गोल फिरवतीये !! हे म्हणजे ते औक्षण का काय म्हणतात ते असेल.’ एकीकडे विचार करता करता परी त्या गोल गोल फिरणाऱ्या तबकाकडे आणि त्यातल्या ज्योतीकडे अगदी एकटक बघत होती. खूप छान, शांत वाटत होतं तिला…तेवढ्या वेळापुरती तिची भूक जणू काही गायबच झाली होती. ” बघ बघ, कशी बघतीये टकामका,” आजी कौतुकानी म्हणाली आणि सगळे हसायला लागले…आता त्यात हसण्यासारखं काय होतं- परीला काहीच कळेना! आजीचं औक्षण झाल्यावर आई परीला घेऊन घरात शिरली आणि सरळ देवघरात गेली. आईला तिथे असं डोळे बंद करून शांत उभं राहिलेलं बघून परीनी पण आपले डोळे हळूच मिटले. किती मस्त वाटत होतं तिथे परीला- कुठलातरी खूप छान वास येत होता. तिनी डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं – ‘कशाचा बरं असेल हा वास?’ तेवढ्यात बाबा आईच्या कानात कुजबुजले,” तुला आवडतो म्हणून मुद्दाम मोगऱ्याचा गजरा आणलाय… ” ते पुढे काहीतरी म्हणणार होते बहुतेक पण तेवढ्यात आजी आत आली आणि बाबा हळूच बाहेर निघून गेले. तिनी आईकडे बघितलं तर ती इतकी गोड हसत होती !! परीला काहीच कळत नव्हतं – ‘नक्की काय चाललंय या दोघांचं?जाऊ दे- आई हसतीये म्हणजे काहीतरी छानच असणार! पण अगं आई…आता जरा माझ्याकडे पण बघ की गं ! मला आता भूक लागलीये .’ परी आईचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होती, पण आई मात्र आजीबरोबर काहीतरी बोलण्यात गुंग होती. मग काय- शेवटी परीनी आपला तो ठेवणीतला टँ sss चा सूर छेडला.तिला असं रडताना बघून आजी आईला म्हणाली,”भूक लागली असेल गं तिला..जा आता खोलीत. आणि तुही आराम कर आता.”

“अले अले, काय जालं आमच्या पलीला ? भुकु लागली?” एकीकडे परीला शांत करत आई तिला घेऊन त्यांच्या खोलीत गेली.

क्रमशः

परीची दुनिया (भाग ६)

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक कोणीतरी काकू खोलीत आली. परीला पाळण्यातून उचलून घेत ती तिच्या आईला म्हणाली,” ताई, बेबीला bcg द्यायचंय ना …घेऊन जाते नर्स कडे.” आणि परीच्या काही लक्षात येईपर्यंत ती चक्क चक्क परीला बाहेर घेऊन जायला लागली. “आईला सोडून मी नाही येणार,” परीनी हळूच आपला निषेध नोंदवायचा प्रयत्न केला. पण ती काकू ऐकतच नव्हती. मग नाईलाजानी परीला आपला तार सप्तकातला सूर लावायला लागला. ती काकू काही बोलणार तेवढ्यात आई आलीच. परीला आपल्या कुशीत घेत म्हणाली, ” मी आणते तिला,तुम्ही व्हा पुढे.”

आईच्या कुशीत गुरफटून परी विसावली. पण थोड्याच वेळात आजूबाजूला बरेच आवाज ऐकू यायला लागले. तिनी डोळे उघडून बघितलं तर आईच्या चेहेऱ्यावर काळजी दिसत होती. “आई ला एवढं टेन्शन का आलंय? ती माझ्याबरोबर असली की मला तर कधीच कुठलं टेन्शन नसतं? किती सुरक्षित वाटतं तिच्या कुशीत आलं की ! पण मग माझ्यासारखीच तिची पण आई असेल का? तिला पण तिच्या आईच्या कुशीत छान वाटत असेल का?” परीची विचारचक्रं सुरू झाली.” पण मग अजून तिची आई का नाही आली? मला थोडंसं जरी बरं वाटत नसेल तरी माझ्या आईला बरोब्बर कळतं आणि ती लगेच येऊन मला कुशीत घेते. मग हिच्या आईला का नाही कळलं अजून ?” परीनी मान वळवून आजूबाजूला बघायचा प्रयत्न केला. तिच्यासारखीच अजूनही दोन तीन बाळं होती त्यांच्या आयांबरोबर… आणि परवाच्या त्या ‘टुचुक’ वाल्या काकू पण दिसल्या तिला. त्यांना बघून तिला एकदम शोनू आणि त्याचं रडणं आठवलं. “अरेच्या, आता मला पण देणार वाटतं ते ‘टुचुक’ का काय ते! खूप दुखलं होतं शोनूला, म्हणूनच आईला टेन्शन आलं असेल का? मला दुखेल म्हणून ? अगं आई, पण आत्तापासूनच कशाला घाबरतीयेस ? जर दुखलं तर बघूया ना मग !” परीच्या मनात एकदम तिच्या आईबद्दल खूपच प्रेम उफाळून आलं..” मला दुखेल की काय – या नुसत्या कल्पनेनीच आईला किती त्रास होतोय !” तिच्याही नकळत तिनी दुपट्यातून हात बाहेर काढला आणि आईच्या हातावर ठेवला. आईनी पण तितक्याच सहजपणे परीचा तो इवलासा हात आपल्या ओठांशी नेला आणि परीकडे बघून ती कसनुसं हसली.

तेवढ्यात त्या टुचुक काकूंनी हाक मारली आणि आई परीला घेऊन त्यांच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली. आईच्या चेहेऱ्यावरची चलबिचल वाढली होती – “थोडं हळू हं,” आईनी काकूंना सांगितल्याचं परीला ऐकू आलं. “अहो ताई, कशाला एवढं टेन्शन घेताय? इंजेक्शन देणार म्हटलं की थोडं दुखणारच . आम्हाला पण नाही आवडत हो लहान बाळांना असं रडवायला…. पण काय करणार; त्यांच्या भविष्यासाठी हे करावं लागतं!” त्या टुचुक काकू एकीकडे इंजेक्शन ची तयारी करत करत आईशी बोलत होत्या. परी पण लक्ष देऊन ऐकत होती. पण तिला नीट समजतच नव्हतं.. ‘इंजेक्शन काय असतं ? शोनू तर म्हणाला होता की टुचुक करतात! म्हणजे मला दोन वेळा दुखणार की काय ? एकदा टुचुक आणि एकदा इंजेक्शन !! आणि भविष्य म्हणजे ? हे सगळे मोठे लोक किती अवघड अवघड शब्द वापरतात!” परीचे विचार चालूच होते तेवढ्यात तिला कुठेतरी काहीतरी टोचलं… एकदम जोरात….कित्ती दुखलं तिला! साहजिकच तिनी एक निषेधाचा ‘टँ sss’ लावला – चांगला दमदार ! आत्ता कळलं तिला – त्या दिवशी शोनू का रडत होता ते. पण परी सूर पकडेपर्यंत ते दुखायचं थांबून गेलं ; त्यामुळे मग परीचं रडणं देखील थांबलं. ते बघून टुचुक काकू आईला म्हणाल्या,” अरे वा! एकदम शूरवीर आहे की तुमची मुलगी ! सुई बाहेर काढल्यावर लगेच गप्प झाली!!” त्यांनी केलेलं कौतुक ऐकून परीची आई खूप खुश झाली. परीला घट्ट जवळ घेत तिनी परीच्या कपाळावर आपले ओठ टेकले….आईकडून अचानक होणाऱ्या या प्रेमाच्या वर्षावामुळे परी पण एकदम खुश झाली आणि आईला हसताना बघून ती पण खुदकन हसली .

क्रमशः

माझी सैन्यगाथा (भाग २८)

ऐश्वर्याचं भगिनीप्रेम

उन्हाळ्याचा रखरखाट संपून आता हळूहळू थंडी पडायला सुरुवात झाली होती. पण जम्मूचा उन्हाळा जितका प्रखर तितकीच तिकडची थंडीही अगदी कडाक्याची! ऐन थंडीच्या दिवसांत तर पहाटे पहाटे इतकं धुकं पडायचं की खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोरचं काही म्हणजे काही दिसायचं नाही…बागेतली झाडं, बागेच्या पलीकडचा रस्ता, रस्त्याच्या पल्याडची घरं… सगळं काही धुक्याच्या पडद्यामागे लपून गेलेलं असायचं. कधी कधी तर बाहेर रस्त्यावर स्कूल बस येऊन थांबायची पण आम्हांला दिसायचीच नाही….फक्त ऐकू यायची…म्हणजे बसचा ड्रायव्हर जोरजोरात हॉर्न वाजवायचा आणि गाडीचे हेडलाईट्स ऑन ऑफ करून सिग्नल द्यायचा. त्यावरून अंदाज बांधत मी आणि ऐश्वर्या बसपाशी पोचायचो.

अशा गोठवणाऱ्या थंडीत मुलांना त्यांच्या पांघरुणातून बाहेर काढून शाळेकरता तयार करणं हे समस्त ‘आई’ वर्गाकरता अशक्य कोटीतलं काम असायचं…..अगदी जीवावर यायचं ! हो ना…आधी स्वतः त्या उबदार रजईमधून बाहेर निघा आणि मग मुलांना ओढून बाहेर काढा.. त्यामुळे सगळे जण ख्रिसमस च्या सुट्ट्यांची अगदी आतुरतेनी वाट बघत होते – आणि शेवटी एकदाच्या सुट्ट्या सुरू झाल्या. तमाम मुलं -आणि पर्यायानी त्यांच्या आया- यांना आता भल्या पहाटे उठायची गरज नव्हती. जाग आल्यानंतर सुद्धा रजई मधे लोळत पडायची परवानगी मुलांना मिळाली होती.

अशाच एका भल्या पहाटे मला जाग आली…हो ! हा जगाचा नियमच आहे.. जेव्हा आपल्याला उशिरापर्यंत झोपायची परवानगी असते तेव्हा नेमकी भल्या पहाटे जाग येते….मलाही याच नियमानुसार त्या पहाटे जाग आली..डोळे उघडून पाहिलं तर वर ceiling fan गोल गोल फिरताना दिसला. मनात पहिला प्रश्न आला-‘ इतक्या थंडीत फॅन कोणी ऑन केला?’ मी तर नक्कीच नव्हता केला ; आणि ऐश्वर्यानी करायचा तर प्रश्नच नाही कारण तिला थंडीच्या नुसत्या विचारानीच कुडकुडायला होतं.. मग हा फॅन कसा काय फिरतोय?’ काही क्षणांत इतके सगळे विचार येऊन गेले मनात. थोडं नीट पाहिल्यावर लक्षात आलं की फॅन फिरतो तर आहे पण गोल गोल नाही- तर वेडा वाकडा ! एकदम शंका आली -‘ हा भूकंप तर नाहीये ना? छे, भूकंप असता तर फक्त फॅन च कसा हलला असता?’ मीच माझी शंका मोडून काढली. अजून थोडा वेळ वाट बघायचं ठरवलं. पुढच्या काही मिनिटांत आपोआपच फॅनचं ते फिरणं/ हलणं थांबलं. थोडं उजाडल्यावर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीला त्याबद्दल विचारलं…कारण जर भूकंपामुळे माझ्या घरातला फॅन हलत असला तर तिच्या घराची जमीनही नक्कीच हलली असणार…आणि माझा अंदाज खरा ठरला. तिला पण पहाटे तिची कॉट थोडी हलल्याचं जाणवलं होतं.

नंतर रेडिओ वर सकाळच्या बातम्यांमधेही भूकंप झाल्याची पुष्टी झाली. पण अगदी हलका झटका असल्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी नव्हती झाली. सगळं काही ‘आलबेल’ होतं.

पण या सगळ्या एपिसोड मुळे माझ्या मनात विचारांची चक्रं सुरू झाली. मनात सगळ्यात आधी मुलींचा विचार आला. सृष्टी तर हे सगळं समजण्यासाठी खूपच लहान होती. ऐश्वर्या उठल्यावर तिला जवळ बसवून घेतलं आणि भूकंप आणि त्यामुळे उद्भवणारे संभावित धोके याबद्दल तिला समजेल अशा भाषेत सांगितलं. अशा वेळी स्वतःचा बचाव कसा करायचा हेही सांगितलं आणि चांगली दोन तीन वेळा उजळणीही करून घेतली.

आजची शिकवण तिच्या किती लक्षात आहे हे बघायला म्हणून दुपारी अगदी सहजच तिला विचारलं,” जर कधी असा भूकंप आला आणि मी जवळपास नसले तर तू काय करशील?” त्यावर क्षणभर विचार करून ती म्हणाली,” तू जर इथे नसलीस तर ? तर मग मी काय करीन सांगू का? मी पटकन सृष्टीला उचलून घेईन आणि पळत पळत बाहेर आपल्या घरासमोरच्या मोकळ्या जागेत जाऊन उभी राहीन !” तिचं ते उत्तर ऐकलं ;तिच्या चेहेऱ्यावरचा तो आत्मविश्वास बघितला आणि मी खरंच धन्य झाले. अशा परिस्थितीची नुसती कल्पना करतानासुद्धा तिच्या मनात पहिल्यांदा सृष्टीचा विचार आला होता. ‘आई जवळ नसताना आपल्या छोट्या बहिणीच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावर आहे,’ हे तिनी स्वतःच ठरवून घेतलं होतं.

मी मनोमन त्या दोघींची, त्यांच्यातल्या या नात्याची दृष्ट काढली. एक ‘आई’ म्हणून त्या क्षणी माझ्यासारखी नशीबवान कोणी नव्हती!!

तो पूर्ण दिवस मी याच विचाराच्या धुंदीत होते. पण राहून राहून एका गोष्टीचं अप्रूप वाटत होतं….ऐश्वर्याच्या या भगिनी प्रेमाचं….’सहवासानी प्रेम वाढतं’ हे मी ऐकून होते, पण आता मला त्याची प्रचिती येत होती.

याबद्दल विचार करताना माझं मन भूतकाळात जाऊन पोचलं… वेलिंग्टन ला… जेव्हा वेलिंग्टन हुन बस्तान बांधायची वेळ आली तेव्हा मला सृष्टीच्या वेळी सातवा महिना लागला होता. आता लवकरच घरात एक छोटं बाळ येणार या नुसत्या कल्पनेनीच ऐश्वर्या खुश होती. एके दिवशी पॅकिंग करताना तिच्या कपड्यांची बॉक्स उघडली तेव्हा आतून तिचे लहानपणीचे कपडे निघाले… छोटी छोटी झबली, टोपडी, दुपटी….तिला खूप गंमत वाटत होती ते सगळं बघताना.. सारखी विचारत होती,” आई, माझे हात इतके छोटे होते ? माझं डोकं इतकं लहान होतं?” तेव्हा बोलता बोलता मी तिला म्हणाले ,” हो, पण आता हे सगळे कपडे येणाऱ्या बाळाला घालायचे.”माझं ते वाक्य ऐकलं मात्र आणि ती एकदम थबकली. मला म्हणाली,” अगं, पण हे माझे कपडे आहेत ना? मग बाळाला का द्यायचे?बाळासाठी नवीन आणू या ना.” तिला समजावत मी म्हणाले,” लहान बाळांना नवीन कपडे नाही घालत. त्यांच्या नाजूक स्किन ला टोचतात ना ते.. म्हणून असे वापरून मऊ मऊ झालेले कपडे घालायचे असतात त्यांना.आणि तसंही आता तर तुला हे कपडे किती लहान होतात ना ?” पण ‘आपले कपडे दुसऱ्या कोणाला तरी द्यायचे’ ही कल्पना तिला अजिबात पटली नाही. साहजिकच होतं म्हणा.. कारण तोपर्यंत तिला कधीच काहीच share करायला लागलं नव्हतं.आणि आता अचानक हा गौप्यस्फोट झाला होता. तिनी तिचे ते सगळे कपडे एकत्र केले आणि मला म्हणाली,” अगं, लहान नाहीयेत काही, हे बघ माझा हात जातोय अजून ह्या फ्रॉक मधे. आणि हे दुपटं तर मला खूप आवडतं.” त्यावेळी मी काही बोलले नाही. पण त्या प्रसंगामुळे माझी बेचैनी वाढली .Sibling rivalry बद्दल मी बरंच काही ऐकलं होतं. आपली खेळणी आणि इतर वस्तू आता दुसऱ्या कोणाबरोबर तरी वाटून घ्याव्या लागणार, इतकंच नाही तर आपले आईबाबा पण आता फक्त आपले नसणार – ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर आपल्या लहान भावंडाबद्दल मनात अढी धरल्याची काही उदाहरणं होती माझ्या ऐकण्यात.

तो पूर्ण दिवस मी या विचारांतच घालवला.विचारांती एक कल्पना सुचली. त्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी आमची फोटो अल्बम्स ची बॉक्स पॅक करायला घेतली. ऐश्वर्याला मदतीला बोलावलं. साहजिकच ती एक एक अल्बम उघडून त्यातले फोटो बघण्यात रंगून गेली. तीच वेळ साधून मी तिचा लहानपणचा अल्बम उघडला आणि तिला दाखवला.म्हटलं,” हे बघ, तू लहान बाळ होतीस ना तेव्हाचे तुझे फोटो…” तीही खूप उत्साहानी सगळे फोटो बघत होती. त्यात तिला तेल मालिश करताना, अंघोळ घालताना, मांडीवर घेऊन झोपवताना असे वेगवेगळ्या वेळी काढलेले फोटो होते. मी एकीकडे तिला सांगत होते,” हे बघ, तू जेव्हा लहान होतीस ना, तेव्हा तुला स्वतः काहीच काम करता यायचं नाही, म्हणून मीच तुझी सगळी कामं करत होते…मालिश, अंघोळ, तुझं खाणं पिणं… सगळं ! मग हळूहळू तू मोठी झालीस आणि आता सगळी कामं तू स्वतः करतेस- like a good girl. पण आता आपल्याकडे जे बाळ येईल ते पण तर असंच तुझ्यासारखं छोटंसं असेल..मग त्याचं पण सगळं काम मलाच करावं लागेल ना ! त्यामुळे मी तर खूपच busy होईन, एखाद्या वेळी तुझ्यापेक्षा बाळाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. पण तू मला मदत करशील ना ? कारण बाबा तर नसणार आपल्या जवळ. मग तू आणि मी मिळून आपल्या बाळाची काळजी घेऊ या. चालेल ना?”

माझं म्हणणं पटलं असावं तिला. कारण ती लगेच मला म्हणाली,” हो आई, आपण दोघी मिळून बाळाकडे लक्ष देऊ.” आणि एवढंच म्हणून थांबली नाही तर तिच्या खेळण्यांमधलं एक टेडी बेअर काढून घेत म्हणाली,” हे देऊ या बाळाला खेळायला. हे खूप मऊ मऊ आहे ना; त्याच्या स्किनला टोचणार पण नाही.” तिचं ते निरागस बोलणं आणि वागणं बघून खूप कौतुक वाटलं होतं तिचं. त्यानंतर मग बराच वेळ आम्ही दोघी ‘येणाऱ्या बाळाची काळजी कशी आणि कोणी घ्यायची’ हेच ठरवत बसलो होतो.

क्रमशः

परीची दुनिया (भाग ५)

शोनूचे आई बाबा शोनूला घेऊन त्यांच्या घरी गेले. पण जायच्या आधी शोनूच्या बाबांनी शोनू आणि परीचे त्यांच्या दोघांच्या आयांबरोबर खूप फोटो काढले. निघता निघता शोनूची आई म्हणाली, “नक्की यायचं हं बारशाला.. मी फोन करीन.” “आत्ताचे फोटो पण फॉरवर्ड कर हं नक्की,” परीच्या आईनी परत एकदा आठवण करून दिली.

शोनू गेल्यावर परीला एकदम एकटं एकटं वाटायला लागलं.ती आईला हाक मारणार इतक्यात आईच आली पाळण्याजवळ आणि परीला उचलून कुशीत घेत म्हणाली,” एकदम रिकामी झाली ना खोली? पण नो प्रॉब्लेम… उद्या आपण पण जाणार आपल्या घरी. मग तर माझ्या परीराणीची मज्जाच आहे.. खूप खूप खेळणी आणून ठेवलीयेत बाबांनी घरी. आपण सगळे मिळून खूप मजा करू या हं !” आईचं बोलणं ऐकता ऐकता परीबाई झोपून गेल्या…ते मगाचचं फोटो सेशन जरा जास्तच hectic झालं होतं तिच्यासाठी!

कुठल्यातरी आवाजानी परीची झोप चाळवली. तिनी आपल्या इवल्याश्या मुठींनी आपले कान झाकून घ्यायचा प्रयत्न केला. पण तो आवाज हळूहळू जास्तच जवळून ऐकू यायला लागला. ‘हे कोण बोलतंय ? आईचा आवाज नाहीये हा !पण आईसारखाच प्रेमळ वाटतोय.कोण बोलतंय ?’ परी आवाज ओळखण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी न राहावून तिनी डोळे मिचमिचे करून बघितलं… अरेच्या, ती तर पाळण्यात नव्हतीच. कोणीतरी तिला आपल्या मांडीवर घेऊन बसलं होतं. एरवी आईशिवाय कोणाच्याही मांडीवर झोपायला परीला अजिबात नाही आवडायचं…कारण लहान बाळांना कसं उचलून घ्यायचं, कसं कुशीत धरायचं हे कोणालाच नीट जमायचं नाही. पण या बाईंच्या मांडीवर लोळत पडायला खूप छान वाटत होतं, त्यामुळे परी अजूनच स्थिरावली. तिच्या हनुवटीला चिमटीत पकडत त्या बाई म्हणाल्या,”काय गं छकुले, ओलखलंश का मला? मी आजी आहे तुझी,” …..”अच्छा, ही आजी आहे होय! आई म्हणतच होती की आता आजी येणार आणि परीचे खूप लाड करणार म्हणून,” आजीचा पदर आपल्या मुठीत घट्ट पकडत परी तोंडभरून हसली. तिला तसं हसताना बघून आजी अजूनच सुखावली,”अगं, बघ बघ….कशी हसतीये ते! डँबिस कुठली !! ओलखलंश वाततं आजीला ?” असं म्हणत आजीनी परीच्या चेहेऱ्यावरून आपला प्रेमळ हात फिरवला. ‘किती मऊमऊ आहे आजीचा हात …अगदी आई सारखा!’ परीच्या मनात आलं. आता परीच्या फेव्हरिट लोकांमधे आई, बाबा आणि शोनू बरोबरच आजीचं पण नाव जोडलं गेलं.

परी आता अगदी लक्ष देऊन आजीच्या गप्पा ऐकत होती. “पण ही आजी माझ्याशी बोलताना असं बोबडं बोबडं का बोलतीये ? मगाशी आईशी तर नीटच बोलत होती!” परीला आजीचं हे असं वागणं काही समजलं नाही. पण तिला काही फरक नव्हता पडला. तिला आजी खूप आवडली होती आणि तिच्याबरोबर अशा गप्पा मारायला, हसायला खूप मज्जा येत होती.

एकीकडे परीला खेळवता खेळवता आजी आईला कित्ती प्रश्न विचारत होती. – “शेक शेगडी साठी कोणी मिळाली का?आणि परीच्या बारशाचं काय ठरवलंयत ?” हे आणि असेच अजून काही…आजीच्या तोंडून ‘बारसं’ हा शब्द ऐकला आणि परीला एकदम शोनूची आठवण आली. ‘अरेच्या, माझं पण बारसं ? ओह, म्हणजे सगळ्याच बाळांचं असतं वाटतं बारसं ….शोनूला सांगायला पाहिजे. पण आता कधी भेटणार आम्ही ?” तेवढ्यात परीला अजूनही काहीतरी आठवलं..शोनू म्हणाला होता -“तुला पण देतील ‘टुचुक’ !” अरे बापरे, म्हणजे हे ‘टुचुक’ पण सगळ्याच बाळांना देतात वाटतं. पण जर त्याच्यामुळे इतकं दुखतं आणि रडू रडू होतं, तरी का देतात? शोनूच्या आईनी त्या काकूंना सांगायला पाहिजे होतं की शोनूला नका देऊ टुचुक; दुखेल त्याला.” परीच्या मनात पूर्ण गोंधळ उडाला होता. काय करावं, कोणाला विचारावं – काहीच सुचेना. तेव्हा तिनी आपलं रामबाण अस्त्र काढलं…एक जोरदार ‘टँsss…’ चा सूर लावला. अचानक तिला असं रडताना बघून आजी पण गडबडली.. तिला तिच्या आईच्या कुशीत ठेवत म्हणाली,” घे बाई, भूक लागली असेल आता तिला.”

आईच्या कुशीत गेल्यावर परीला एकदम सुरक्षित वाटायला लागलं. आता तिला त्या दुखवणाऱ्या ‘टुचुक’ ची पण भीती नव्हती वाटत !!!

क्रमशः

माझी सैन्यगाथा ( भाग २७)

जम्मू मधल्या त्या दोन वर्षांत नितीन अधेमधे घरी यायचा. म्हणजे जर कधी एखाद्या official कामासाठी राजौरीहून नगरोटा किंवा जम्मूला आला तर मग काम झाल्यावर दुपारी जेवायला घरी यायचा आणि जेवण झाल्यावर परत राजौरीला रवाना व्हायचा.. तेवढीच धावती भेट व्हायची आमची आणि त्याची.

या संदर्भातली सृष्टीची एक गंमत आठवली. त्या दिवसांत नितीन photochromatic चष्मा वापरायचा. साहजिकच दुपारी तो घरी पोचेपर्यंत चष्म्याच्या काचा काळ्या झालेल्या असायच्या…गॉगल्स सारख्या . त्यामुळे बहुदा सृष्टीच्या बालमनात तिच्या बाबांची जी प्रतिमा होती ती ‘गॉगल्स घातलेला माणूस’ अशी असावी. खरं सांगायचं तर आमच्या कोणाच्या हे लक्षातही नव्हतं आलं.पण एका रविवारी ऐश्वर्या आणि मी दोघी मिळून टीव्ही वर कार्टून शो बघत होतो. सृष्टीपण तिथेच होती. अचानक टीव्ही कडे बघून ती म्हणाली,” बाबा …बाबा…” सुरुवातीला थोडा वेळ मला कळलंच नाही की ही त्या कार्टून्स ना बघून ‘बाबा’ का म्हणतीये – वाटलं कदाचित आठवण आली असेल बाबांची पण अजून नीट बोलता येत नाही म्हणून नुसतीच त्याला हाक मारत असेल. तेवढ्यात परत स्क्रीनकडे बोट दाखवत ती म्हणाली,”बाबा…” बघितलं तर स्क्रीनवर ‘johny bravo’ दिसत होता… पिवळे केस, काळा टी शर्ट आणि डोळ्यांवर काळे गॉगल्स !

ऐश्वर्या तिला समजावत म्हणाली,”ते बाबा नाहीयेत गं .. johny bravo आहे तो!” पण जेव्हा जेव्हा तो दिसायचा तेव्हा तिचं ‘बाबा,बाबा’ चालूच होतं.त्या johny bravo मधे आणि तिच्या बाबांमधे जर काही साम्य असेल तर ते म्हणजे डोळ्यांवरचा काळा चष्मा! आणि गंमत म्हणजे, ती फक्त त्या johny ला च बाबा नाही म्हणायची तर तिच्या आजूबाजूला तिला जे कोणी काळे गॉगल्स घातलेले दिसायचे त्या प्रत्येकाला ती बाबा म्हणायची….टीव्ही वर प्रेस कॉन्फरन्स मधे गॉगल्स घालून आलेला सलमान खान, माझ्याकडच्या ‘Top Gun’ च्या पोस्टर मधला Tom Cruise , वगैरे वगैरे !!! तिला बहुतेक वाटत होतं की ‘जे असे गॉगल्स घालतात त्यांचं नाव बाबा असतं’.

वरवर जरी मी हे सगळं हसण्यावारी नेत असले तरी मनातून मला या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं.. कारण ज्या वयात फक्त आई बाबा हेच लहान बाळांचं विश्व असतं त्या वयात सृष्टी साठी तिचे बाबा हे तिच्यासाठी फक्त एक व्यक्ती होते…अधूनमधून थोड्या वेळाकरता येऊन जाणारे … त्या नात्याची आणि तिची ओळखच नव्हती झाली. ती दोन वर्षांची होईपर्यंत तिच्या भावविश्वात कायमस्वरूपी म्हणता येतील अशा ‘आई आणि ताई’ या दोनच व्यक्ती होत्या. कारण ‘बाबा’ म्हणून नितीनची ओळख होईपर्यंत त्याची जम्मूहून निघायची वेळ आलेली असायची.

पण त्यामुळे ऐश्वर्या आणि सृष्टीचं नातं अगदी पक्कं झालं. रोज सकाळी शाळेत जाताना सृष्टीला कुशीत घेऊन ‘bye’ म्हटल्याखेरीज ऐश्वर्या चा पाय नाही निघायचा घरातून.. आणि दुपारी शाळेतून परत आल्यावर हातपाय धुवून ती आधी सृष्टीकडे पळायची. सृष्टीला सुद्धा ताईबरोबर खेळायला खूप आवडायचं. ऐश्वर्याची शाळेतून यायची वेळ झाली की सृष्टी रांगत रांगत मुख्य जाळीच्या दारापाशी जाऊन बसायची. तिला कसं कळायचं कोण जाणे ! पण तिचा तो वेळेचा अंदाज अगदी बरोब्बर असायचा. बाहेर रस्त्यावर स्कूल बस थांबली की ही आतून आपल्याच भाषेत ताईला हाका मारायला सुरुवात करायची.

ऐश्वर्याला पैशांचं आणि बचतीचं महत्व कळावं म्हणून मी तेव्हा दर महिन्याला तिला अगदी जुजबी असा पॉकेट मनी देत होते. ते पैसे तिनी कुठे आणि कसे खर्च करायचे ते ठरवायची पूर्ण मुभा होती तिला. पण ती ते सगळे पैसे तिच्या पिगी बँक मधे साठवून ठेवायची. जेव्हा तिला विचारलं की ‘तू हे पैसे खर्च का नाही करत?’ तर म्हणाली,” मला सृष्टीच्या फर्स्ट बर्थडे ला तिला एक मस्त गिफ्ट द्यायचं आहे , म्हणून सेव्ह करतीये!” इतकं समाधान वाटलं मला तिचं हे उत्तर ऐकून . शेवटी एकदाचा सृष्टीचा पहिल्या वर्षाचा वाढदिवस महिन्याभरावर आला. नितीनला त्या वेळी सुट्टी मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याला वाढदिवसाच्या फोटोज वरच समाधान मानावं लागणार होतं. आमच्या नेहेमीच्या प्रथेप्रमाणे आम्ही दोन वेळा तिचा वाढदिवस साजरा करायचा ठरवला…एकदा तिच्या जन्मतारखे प्रमाणे आणि दुसऱ्यांदा जेव्हा आम्ही चौघं एकत्र असू तेव्हा! असे कितीतरी वाढदिवस आणि anniversaries आम्ही दोन दोन वेळा साजरे केले आहेत. म्हणतात ना..’साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा ‘ तसंच काहीसं…’चौघे एकत्र असती जेव्हा, सण समारंभ घडती तेव्हा !’

पण ऐश्वर्या चा उत्साह मात्र खूप दांडगा होता. रोज सृष्टीला सांगायची,” आता तुझा वाढदिवस येणारेय. आपण खूप मज्जा करूया, बरं का!”आणि तिचा हा उत्साह बघून मी पण अगदी जोरात तयारीला लागले. आमच्या कॉलनीतल्या ऐश्वर्या च्या सगळ्या मित्र मैत्रिणींना बोलवायचं ठरलं. एक दिवस आम्ही कॉलनी मधल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधे गेलो – ऐश्वर्याला सृष्टीसाठी एक छानसं गिफ्ट घ्यायचं होतं ; त्याशिवाय पार्टीला येणाऱ्या मुलांकरता रिटर्न गिफ्ट्स वगैरे पण बघायची होती.

ऐश्वर्यानी तिच्या पिगी बँक मधले सगळे पैसे काढून माझ्याकडे दिले होते. त्या गिफ्ट्स च्या दुकानात तिनी खूप खेळणी, soft toys वगैरे बघितली; पण प्रत्येक वेळी ‘हे नाही आवडणार सृष्टीला,’ असं म्हणत ती सगळी नापास केली. शेवटी एकदाचं तिच्या मनासारखं एक ‘building blocks’ चं खेळणं मिळालं आणि त्या दुकानदाराला आणि मला दोघांनाही ‘हुश्श’ झालं ! मी पैसे देऊन बाहेर निघणार इतक्यात ती मला म्हणाली,” आई, मला तुझ्यासाठी पण एक खूप मस्त गिफ्ट घ्यायचंय.” मी तिला विचारलं,” अगं, पण वाढदिवस तर सृष्टीचा आहे. मग मला कशाला गिफ्ट ?” त्यावर ती म्हणाली,” तू रोज आमच्यासाठी कित्ती काम करतेस, आम्हांला टेस्टी टेस्टी खायला करून देतेस, बाबांची आठवण आली की त्यांच्या छान छान गोष्टी सांगतेस…. म्हणून तुला पण गिफ्ट देणारेय मी. माझ्या पॉकेट मनी मधून !” आज अचानक ही जाणीव कशी काय झाली असावी – हा विचार करत होते तेवढ्यात आठवलं- आदल्याच दिवशी तिच्या टीचर नी त्यांना ‘मातृदेवो भव’ चा अर्थ समजावून सांगितला होता.

मग आमची स्वारी पुन्हा दुकानात शिरली. पण यावेळी शोधाशोध करायच्या भानगडीत न पडता ती मला म्हणाली,” तुला जे आवडेल ते घे !” त्यावेळचे तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बघून कुबेर पण लाजला असता…. जणूकाही त्या क्षणी ती जगातली सगळ्यात श्रीमंत मुलगी होती आणि तिच्या आईला जे पाहिजे ते विकत घ्यायची तिची तयारी होती. पण सृष्टीचं गिफ्ट घेतल्यानंतर आता तिच्याकडची गंगाजळी खूपच आटली होती. एकदा विचार आला- तिला म्हणावं – मी देते या गिफ्टचे पैसे. पण तिचा तो एकंदर उत्साह आणि ‘स्वतःच्या पैशातून आईला गिफ्ट देण्याचा’ तो अभिमान आठवला आणि मी गप्प बसले. मी दुसऱ्या पद्धतीनी तिला मदत करायचं ठरवलं. त्या राहिलेल्या पैशांत घेता येईल अशी वस्तू सिलेक्ट केली… एक छोटासा ट्रे … माझा चॉईस तिला अजिबात नाही आवडला. कपाळावर आठ्या घालत ती म्हणाली,” ए, इतकं छोटं गिफ्ट नाही काही; खूप मोठ्ठं घे काहीतरी.” आणि ती स्वतः शोधायला लागली…काचेचा टी सेट, एक मोठ्ठी पर्स, ‘I love you’ असं लिहिलेलं एक टेडी बेअर….. तिची ती धडपड बघून एकीकडे तिच्याबद्दल खूप कौतुक ,खूप प्रेम वाटत होतं ; पण सत्य स्थिती माहीत असल्यामुळे तितकंच वाईटही वाटत होतं. कारण त्या सगळ्या वस्तू तिच्या बजेट मधे बसणाऱ्या नव्हत्या. पण हे कटू सत्य तिला कळू न देता मी काहीबाही कारणं सांगून त्या सगळ्या वस्तू बाजूला सारल्या आणि तो छोटासा ट्रे पुन्हा तिच्या समोर धरत म्हणाले, “मला हाच खूप आवडलाय. प्लीज, मला हाच घेऊन दे ना .” माझ्या विनवणी चा योग्य तो परिणाम झाला आणि शेवटी माझ्या गिफ्टची पण खरेदी झाली.

क्रमशः