NAT GEO …याचि देही याचि डोळा (भाग २)

Aberdare country club हुन पुढे जाण्यासाठी एका मिनी बस ची सोय केली होती. बस चा ड्रायव्हर -‘चार्ल्स’ एकीकडे आमच्याशी गप्पा मारत होता. लवकरच आम्ही Aberdare National Parkला पोचलो. तिथल्या ‘The Ark’ हॉटेल मधे आम्ही एक रात्र थांबणार होतो.

हॉटेलचं नाव ऐकल्यावर Noah’s Ark ची आठवण होते ना! लांबून पाहिलं तर तसंच दिसते ते …फक्त Noah ची ark पाण्यात तरंगत होती; ही ark मात्र हिरव्यागार जंगलात तरंगत असल्यासारखं वाटत होतं.

मुख्य रस्त्यावरून हॉटेल पर्यंत पोचायला एका लाकडी पुलावरून जावं लागतं.

पुलाच्या तोंडापाशी लागलेला बोर्ड वाचल्यावर नकळत सगळे अगदी हळूहळू काळजीपूर्वक पावलं टाकायला लागले. हो ना, कारण जर काही कारणानी पुलावरून खाली पडलो तर सरळ खालच्या जंगलात जाऊन आदळणार … पण खालची झाडं इतकी घनदाट होती की माझ्या मते तरी वरून जर कोणी पडलंच तर जमिनीपर्यंत पोचणारच नाही.. मधेच कुठेतरी अडकून जाईल….त्रिशंकू बनून.

त्या शांत वातावरणात लाकडी पुलावरून चालताना होणारा तो किर किर आवाज ऐकून एखादी सस्पेन्स थ्रिलर movie बघत असल्यासारखं वाटत होतं.

हॉटेल मधे पोचलो तेव्हा ऑलरेडी आमचं सामान आमच्या खोल्यांसमोर ठेवलं होतं.तिथल्या खोल्यांची रचना अशी होती की प्रत्येक खोलीच्या खिडकीतून बाहेरचं दृश्य दिसेल.

हॉटेलच्या समोरच एक मोठ्ठा तलाव होता आणि त्याच्या पल्याड जंगल.

हॉटेल च्या तळ्याकडच्या बाजूला दोन viewing decks होती..एक वरच्या मजल्यावर ‘open air ‘ आणि दुसरं खालच्या मजल्यावर …त्याला मात्र सगळ्या बाजूनी अगदी खालपासून वरपर्यंत काचेच्या खिडक्या होत्या.

थोडक्यात काय तर तुम्हांला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही त्या डेक्स वरून त्या पाणवठ्यावर येणारे प्राणी बघू शकाल अशी सोय केली होती. दिवसा वरच्या डेक वरून आणि रात्री अंधार झाल्यावर खालच्या डेक वरून… चारही बाजूंनी काचेच्या खिडक्या असल्यामुळे रात्रीच्या वेळी डास, रातकिडे आणि तत्सम उपद्रवांची काळजी नव्हती तिथे.

मस्तपैकी चहा, कॉफी चा आस्वाद घेत तिथल्या सोफ्यावर बसून खाली फिरणाऱ्या प्राण्यांचं निरीक्षण करण्यात वेळ कसा आणि कुठे गेला ते कळलंच नाही.

तिथे आम्हांला हत्तींचे कळप दिसले. त्याचबरोबर हरणं, रानडुकरं, आणि cape buffalos ही बघायला मिळाल्या.

एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट बघितली तिथे..सगळे प्राणी- खास करून हत्ती आणि रानगवे अधून मधून तिथली माती खात होते..हत्ती तर अक्षरशः त्यांच्या सुळ्यांनी उकरून उकरून मातीची ढेकळं खात होते. मी जेव्हा त्या हॉटेलच्या स्टाफ मधल्या एकाला याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ‘मातीतून त्या प्राण्यांना खनिजं मिळतात.’

दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा abredare country club च्या दिशेनी कूच केलं. जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला ‘मॅकेडेमिआ’ झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली दिसली. ‘या झाडाच्या बिया खूप चविष्ट असतात आणि बऱ्याच देशांना एक्स्पोर्ट केल्या जातात.’ -असं आमच्या ड्रायव्हर कडून कळलं.

Country club मधून आमचं बाकीचं सामान घेऊन आम्ही पुढे ‘Sweet waters serena camp’ मध्ये जायला निघालो. इथून पुढच्या प्रवासात पुन्हा ‘नामजोशी’ च आमचं सारथ्य करणार होता.

रस्त्यात एका curio shop च्या समोर आमची जीप थांबली. उतरून बघितलं तर काय….आम्ही चक्क विषुववृत्तावर उभे होतो. शाळेत असताना भूगोलाच्या पुस्तकातुन अभ्यासलेलं विषुववृत्त त्या क्षणी आमच्या पायाखाली होतं. नुसत्या विचारानीच खूप मस्त वाटत होतं.

तिथल्या एका माणसानी आम्हांला एक प्रात्यक्षिक करून दाखवलं. विषुववृत्ताच्या संदर्भात पाण्याचा प्रवाह कसा बदलतो ते प्रत्यक्ष बघायला मिळालं. उत्तर गोलार्धात पाणी clockwise फिरतं आणि या उलट दक्षिण गोलार्धात anti clockwise फिरतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे actual विषुववृतावर मात्र अशी कुठलीही direction नसते,

आम्हांला ज्या माणसानी हा डेमो दाखवला त्यानी अजूनही एक दोन इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या.. उत्तर गोलार्धात उगवणाऱ्या वेली जेव्हा एखाद्या झाडाचा किंवा इतर वस्तूंचा आधार घेतात तेव्हा त्या clockwise दिशेनी त्याला विळखा घालतात..आणि दक्षिण गोलार्धात बरोब्बर या उलट आढळून येतं.

पण जेव्हा त्याला विचारलं की ,’ actual विषुववृत्तावर जर एखादी वेल उगवली तर?’ पण या प्रश्नाचं उत्तर नाही सांगितलं त्यानी! म्हणजे चक्क ऐकून ही न ऐकल्यासारखं केलं.

अजून एक गंमत म्हणजे..उत्तर गोलार्धात जन्माला आलेल्या बाळांच्या केसांचं जावळ clockwise वाढतं आणि दक्षिण गोलार्धातल्या बाळांचं anti clockwise ! हे त्याचं माणसानी सांगितलं आणि यावेळी सुद्धा विषुववृत्तावरच्या बाळांबद्दल चा प्रश्न त्यानी ऐकलाच नाही!

निसर्गाची ही किमया बघून आम्ही पुन्हा आमच्या जीप मधे बसलो आणि ‘sweet waters camp’ ला जाऊन पोचलो.

या कॅम्पचं वैशिष्ट्य म्हणजे इथे राहण्यासाठी टेन्ट्स ची सोय आहे.

म्हणजे बाहेरून ते tent सारखे दिसतात पण आतल्या सगळ्या सोयी आणि सुविधा कुठल्याही स्टार हॉटेल सारख्याच आहेत.

इथल्या सगळ्या टेन्ट्स मधून समोरचं विस्तीर्ण पठार दिसतं….आणि तिथे मुक्तपणे विहार करणारे वेगवेगळे प्राणी देखील! तिथल्या छोट्याश्या तळ्याच्या आसपास झेब्रा, हरणं यांचे कळप अगदी बिनधास्त चरताना दिसत होते. मधेच एक दोन हत्ती ही आम्हांला दर्शन देऊन गेले. दूरवर तीन चार गेंडेही दिसले ,

कॅम्प मधे फिरताना अजून एक ओळखीची गोष्ट दिसली…झाडांवर बांधलेली सुईण पक्ष्यांची घरटी.

त्या घरट्यांबद्दल सांगताना नामजोशी म्हणाला,” नर Weaver bird (सुईण) ही घरटी बांधतात.”घरटं बांधून झाल्यावर तो नर पक्षी मादी सुईण पक्षिणीला बोलावून ते घरटं दाखवतो. जर तिला ते पसंत पडलं तर ती त्या नर पक्ष्याबरोबर राहायला सुरुवात करते. पण जर तिला ते घरटं आवडलं नाही तर ती पुढचा मागचा विचार न करता सरळ ते घरटं मोडून टाकते….मग काय..तो नर पक्षी परत नवीन घरटं बांधायला सुरुवात करतो.काही वेळा तर एखादा स्मार्ट नरपक्षी आधीच दोन घरटी बांधून ठेवतो….मॅडम ना एक नाही पटलं तर दुसरं तयार!

सेरेना कॅम्प मधे एक रात्र राहिल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही नैवाशा ला जायला निघालो. गप्पा मारता मारता आम्ही सहज च नामजोशी ला सांगितलं की,” आम्हांला बाकी सगळे प्राणी तर दिसले पण गेंडा मात्र जवळून नाही बघता आला.” त्यावर तो म्हणाला,” डोन्ट वरी, मी दाखवतो तुम्हाला ..अगदी जवळून..तुम्ही त्याला स्पर्श पण करू शकाल.” आधी मला वाटलं, उगीचच बाता मारतोय. पण थोड्या वेळातच आम्ही खरंच दोन शिंगं असलेल्या एका black rhino च्या समोर उभे होतो. त्या rhino चं नाव होतं ‘बराका’.

नामजोशी नी म्हटल्या प्रमाणे खरंच आम्ही ‘बराका’ ला अगदी जवळून बघू शकलो, स्पर्श देखील करता आला. पण एकाच गोष्टीचं वाईट वाटलं…ते म्हणजे बराका आंधळा होता. म्हणजे बघा ना…त्याला बघायला देश-विदेशातून लोक येत होते, पण त्याला मात्र ते कोणीच दिसत नव्हते.

बराका बरोबर थोडा वेळ थांबून नंतर नामजोशी आम्हांला Sweetwaters Chimpanzee Sanctuary मधे घेऊन गेला. तसं पाहिलं तर केनिया मधे चिंपांझी फारसे आढळून येत नाहीत. पण १९९३ साली बुरुंडी मधे सिव्हिल वॉर सुरू झाल्यावर तिथलं चिंपांझी साठीचं rescue center बंद करायला लागलं. त्यावेळी केनिया सरकार नी तिथल्या चिंपांझीना स्वतः च्या देशात कायमचा आसरा दिला.

या sanctuary मधे येणारे चिम्प्स बऱ्याच वेळा खूपच दयनीय अवस्थेत असतात. शारीरिक (आणि कदाचित मानसिक ) हाल अपेष्टा सहन करायला लागल्यामुळे कितीतरी वेळा ते जखमी, अशक्त अवस्थेत या sanctuary मधे दाखल होतात. पण इथे त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. त्यांचा आहार, औषधपाणी यांकडे अगदी बारीक लक्ष दिलं जातं.

आम्ही जेचा तिथे पोचलो तेव्हा तिथला गार्ड आम्हांला आत घेऊन गेला. थोडं चालून गेल्यावर आम्ही एका जाळीच्या कुंपणापाशी थांबलो. कुंपणाच्या पलीकडे तीन चिम्प्स बसले होते….’पोको, सौक्रेटिस आणि ऑस्कर ‘… त्यातला सौक्रेटिस नावाप्रमाणेच सगळ्यात हुशार होता….(का तो हुशार होता म्हणून त्याला सगळे सौक्रेटिस म्हणत होते ??)

पोको ची एक खासियत होती..त्याला माणसांप्रमाणे (मागच्या) दोन पायांवर चालता येतं. त्याला तसं चालताना बघून लोकांना खूप आश्चर्य वाटतं आणि त्याच बरोबर त्याचं कौतुकही! पण त्याच्या या achievement मागचं खरं कारण जेव्हा कळलं तेव्हा खूप वाईट वाटलं. १९९५ साली पोको ला या sanctuary मधे आणण्यात आलं, पण त्या आधीची नऊ वर्षं तो बुरुंडी मधे एक छोट्याश्या पिंजऱ्यात राहात होता… आणि तो पिंजरा इतका अरुंद होता की त्यात पोको ला फक्त बसण्यापुरेशी किंवा मागच्या पायांवर उभं राहण्याइतकीच जागा होती. कायम त्याच अवस्थेत राहायला लागल्यामुळे आता पोको माणसांसारखा उभा राहू शकतो, चालू शकतो.

तिथे फोटोग्राफी साठी परवानगी नसल्यामुळे इच्छा असूनही पोको चा फोटो नाही काढू शकले.पण नंतर सहजच म्हणून गूगल वर पाहिलं तर चक्क तिथे मला पोको भेटला.

चिम्प्स चा निरोप घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो. थोड्याच वेळात आम्ही नैवाशा मधल्या ‘Lake Naivasha Country Club’ मधे पोचलो.

मसाई वेशभूषेतला एक हसतमुख ‘मसाई’ आमच्या स्वागतासाठी उभा होता.

त्यानी आम्हांला जे ‘वेलकम ड्रिंक’ दिलं ते खूपच रिफ्रेशिंग होतं आणि चवही वेगळी वाटत होती. जेव्हा मी त्याला त्या ड्रिंक चं नाव विचारलं तेव्हा तो म्हणाला,’This is ‘cbitomato (चिटोमाटो).” मला वाटलं,चिटोमाटो नावाचं एखादं स्थानीय फळ असेल.

पण नंतर या चिटोमाटो ची मिस्टरी उलगडली…ते फळ होतं ‘tree tomato’s (ट्री टोमॅटो)…पण त्या माणसाच्या स्थानीय accent मुळे एका साध्या सरळ फळाला एक exotic नाव मिळालं.

आणि अश्या या ‘ऐतिहासिक’ चिटोमाटो ज्युस चा फोटो तर हवाच ना संग्रही!

नैवाशा मधली आमची कॉटेज अगदी मोक्याच्या ठिकाणी होती. अगदी नैवाशा लेक च्या काठी!

कॉटेजच्या समोर पसरलेली हिरवळ, campfire ची सोय…सगळं कसं स्वप्नवत !!!

कॉटेज मधून बाहेर पाहिलं की समोर विस्तीर्ण नैवाशा लेक

दुपारच्या जेवणानंतर आम्ही नैवाशा लेक मधे बोट राईड करता गेलो. त्या लेक मधे मोठ्या प्रमाणावर पाणघोडे आढळतात….आढळतात म्हणण्यापेक्षा असतात म्हणणं जास्त योग्य ठरेल. कारण अर्ध्या पाऊण तासाच्या त्या बोट राईड मधे आम्हांला एकाही पाणघोड्याचं नीट दर्शन नाही झालं.. अधूनमधून पाण्यात उडणाऱ्या फवाऱ्यांमुळे त्या ठिकाणी पाणघोडे असल्याचं लक्षात येत होतं, पण त्यांच्या थोडं जवळ जायला लागताच ते पाण्याखाली बुडी मारून बसायचे. आमचे हिरमुसलेले चेहरे बघून आमचा बोटचालक म्हणाला,” रात्री हॉटेलच्या परिसरात खूप पाणघोडे दिसतील तुम्हांला.” त्या एका आशेवर आम्ही रात्रीची वाट बघत बसलो.

‘संध्याकाळनंतर एकट्यानी बाहेर फिरायला तिथे मनाई होती. जर खोली बाहेर कुठेही जायचं असेल तर आधी फोन करून हॉटेलच्या गार्ड ला बोलावून घ्यायचं आणि त्याच्या बरोबरच जायचं- अशी सक्त ताकीद आम्हांला आधीच मिळाली होती. कारण दिवसा पाण्यात दडी मारून बसलेले पाणघोडे अंधार पडल्यावर बाहेर निघतात आणि हॉटेल समोरच्या मोकळ्या जागेत स्वच्छंद विहार करताना दिसतात. पण त्यांच्यापासून तेवढाच धोकाही असतो. आणि म्हणूनच आपल्या रक्षणासाठी हॉटेलचे गार्डस नेहेमी बरोबर असतात.

पण आमच्या सोबतीसाठी जे दोन गार्डस आले होते त्यांच्याकडे टॉर्च शिवाय दुसरं कुठलंही हत्यार किंवा काठी वगैरे काहीच नव्हतं. साहजिकच मी त्यांना त्याबद्दल विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, जर टॉर्च किंवा तत्सम लाईट एकदम त्यांच्यावर (hippopotamus वर) टाकला तर ते जागच्या जागीच स्तब्ध होतात.

आम्ही जेव्हा रात्री जेवून परत आमच्या कॉटेज मधे जात होतो, तेव्हा बरोबर असलेला गाईड म्हणाला,”तुम्ही खूप लकी आहात. तुमच्या कॉटेजच्या समोरून च इथल्या पाणघोड्यांचा वहिवाटीचा रस्ता आहे. त्यामुळे रात्री तुम्हांला बरेच पाणघोडे दिसतील.”

रात्री आत बसल्या बसल्या बाहेरचं दृश्य दिसावं म्हणून कॉटेजच्या बाहेरच्या खोलीत सगळीकडे काचेची दारं होती. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता आम्ही पाणघोड्यांची वाट बघत बसलो.

बाहेरचं दृश्य खरंच नजर खिळवून ठेवणारं होतं.

समोरचा नैवाशा लेक आता अंधारात हरवून गेला होता. आमच्या कॉटेजच्या व्हरांड्यातल्या लाईट चा उजेड समोरच्या लॉन वर पसरला होता. त्यातच आजूबाजूची उंच उंच झाडंही आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती.

मधूनच एखाद्या पक्ष्याचा किंवा रातकिड्यांचा आवाज कानावर पडत होता. पण त्यावेळी आम्ही फक्त पाण्यातून बाहेर येणाऱ्या हिप्पो ची वाट बघत होतो. अचानक कॉटेजच्या डाव्या बाजूला कसलासा आवाज
ऐकू आला. आम्ही त्या बाजूच्या खिडकीकडे धावलो. हळूच पडदा बाजूला सारून पाहिलं. घनदाट झाडी मधून काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. पण आवाज झाडीच्या पलीकडुनच येत होता. आणि थांबून थांबून पण सतत येत होता….हा नक्कीच हिप्पो चा आवाज होता…..दुपारी बोट राईड च्या वेळी आम्ही हा आवाज ऐकला होता. पण कितीही प्रयत्न केला तरी पलीकडचा हिप्पो मात्र शेवट पर्यंत नाही दिसला.शेवटी कंटाळून सगळ्यांनी झोपायला जायचं ठरवलं. पण मला काही केल्या झोप लागेना…..शेवटी न राहवून मी बाहेरच्या खोलीत जाऊन बसले….आणि थोड्याच वेळात उजव्या बाजूच्या झाडांमागे काहीतरी हालचाल जाणवली. प्रथमदर्शनी नीटसं कळलं नाही…पण नीट लक्ष देऊन पाहिलं आणि चक्क चक्क एक हिप्पो वावरताना दिसला. मी धावत जाऊन नितीन ला आणि दोन्ही मुलींना उठवलं. आम्ही सगळे बाहेरच्या खोलीत येईपर्यंत आमचा तो मित्र फिरत फिरत आमच्या समोरून पाण्याच्या दिशेनी जायला निघाला ;आणि बघता बघता समोरच्या अंधारात नाहीसा झाला.

त्या घाई गडबडीत जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याचा फोटो घ्यायचा ही प्रयत्न केला पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. खरं सांगायचं तर प्रत्यक्ष दर्शनाचा तो अनुभव आणि तो आनंद च कायम लक्षात राहील आमच्या!

त्यानंतर रात्री मधून मधून उठून मी बाहेर बघत होते. एक दोन झेब्रा दिसले आसपास चरताना, पण हिप्पो मात्र नाही दिसला एकही!

पण ही कसर पहाटे पूर्ण झाली. साधारण साडेचार च्या सुमाराला एक एक करत पाच सहा पाणघोडे त्यांच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून परत पाण्याच्या दिशेनी जायला निघाले…. आमच्या साठी तर मेजवानीच होती ती जणू काही!

अशा प्रकारे आमचं नैवाशा मधलं वास्तव्य ‘सुफळ संपूर्ण’ ठरलं!

दुसऱ्या दिवशी सकाळी नैवाशा ला राम राम ठोकून आम्ही पुढे निघालो…आमच्या ट्रिप मधल्या शेवटच्या आणि सगळ्यात exciting ,रोमांचक अनुभवासाठी….

क्रमशः

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s