Keep a place for everything…..

काही वर्षांपूर्वी एका पुस्तकात एक वाक्य वाचलं होतं..

” Keep a place for everything and keep everything in place.”

खूपच आवडलं मला ते ; अगदी मनोमन पटलं म्हणा ना ! ‘ घरातल्या प्रत्येक वस्तूसाठी एक नियोजित जागा हवी आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ती वस्तू त्या जागेवर हवी ‘!! माझ्या ‘आवराआवरी’ च्या संकल्पनेत अगदी चपखल बसणारी विचारधारा आहे ही !

माझं आणि या आवराआवरीचं नातं म्हणजे अगदी ‘जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा ‘ असंच काहीसं आहे. आमच्या कॉलेज च्या ग्रुप मधले माझे मित्र मैत्रिणी तर माझ्या या नीटनेटकेपणाला थोडे घाबरूनच असायचे. माझी एक मैत्रीण तर नेहेमी मला चिडवायची…”प्रिया चा ‘आवराआवरी’ मोड ऑन झाला की कोणी तिच्या समोर नका जाऊ बरं का !सारखं मधे मधे केलंत तर तुम्हांलाही उचलून खुंटीवर लटकवून ठेवेल.”

शाळा कॉलेजमधे असताना माझ्या या ‘आवराआवरी’च्या कक्षा तशा सीमितच होत्या- म्हणजे कपाटातले फक्त माझे कप्पे आवरायची परवानगी असायची. बाकीचे माझ्या बहीण भावांचे कप्पे माझ्यासाठी out of bounds असायचे. पण माझ्या आईला माझ्या या छंदाची कल्पना होती. जर एक दोन दिवस काहीच ‘आवरायला’ मिळालं नाही तर मला withdrawal symptoms येतात हे तिला माहीत होतं. त्यामुळे ती अधूनमधून मला तिचं कपड्यांचं कपाट उघडून द्यायची आणि अगदी DDLJ मधे जसा अमरीश पुरी काजोल ला म्हणतो … ‘जा सिमरन जा …जी ले अपनी ज़िंदगी ।’ …तशाच आविर्भावात म्हणायची,” कर काय करायचं ते!’

मग काय; ‘पु ल.देशपांडें’च्या म्हैस मधला झंप्या बगुनाना ना म्हणतो तशीच काहीशी … पुढच्या एक दीड तासाची निश्चिंती ! पण माझं काम फत्ते झाल्यावर जेव्हा आई येऊन पाहणी करायची तेव्हा तिच्या चेहेऱ्यावर दिसणारं कौतुक मला अजूनही लक्षात आहे.

कॉलेजमधे असताना मी दर रविवारी सगळे कपडे धुवून, नीट इस्त्री करून कप्प्यात लावून ठेवायची. वाटायचं -‘चला, आता आठवडाभर काळजी नाही. इतरांना पडतो तसा ‘कॉलेजला जाताना कुठले कपडे घालू ?’ हा प्रश्न नाही पडणार’..

पण सोमवारी सकाळी जेव्हा मी कपाट उघडून बघायची तेव्हा सगळे व्यवस्थित घड्या केलेले कपडे बघून मनात पहिला प्रश्न यायचा तो हाच- ‘कॉलेजला जाताना यातले कुठले कपडे घालू?’ Problem of plenty की काय म्हणतात ना ते हेच असावं बहुतेक.

वाढत्या वयाबरोबर माझं हे ‘आवरण्याचं’ व्यसन हळूहळू वाढतच गेलं. आधी फक्त माझे स्वतःचे कपडे, वह्या पुस्तकं यातच मी समाधानी होते, पण पुढे त्यात स्वैपाकघरातली भांडीकुंडी, फ्रीज, टीव्ही युनिट वगैरे वगैरे add होत गेले. पण तरीही घरात अशा बऱ्याच जागा आणि वस्तू होत्या ज्या माझ्यासाठी banned होत्या. त्यातली एक म्हणजे माझ्या बाबांचं पेंटिंग चं सामान.. बाबा खूप छान पेंटिंग्ज करायचे ; पुण्याच्या भाषेत सांगायचं तर खरंच ‘अप्रतिम, लै भारी’ एकदम क sss ड sss क !!! रोज संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर ते एकीकडे चहा पीत चित्र काढायचे. त्यांनी काढलेली, पेंट केलेली चित्रं बघून खरंच खूप आनंद व्हायचा .. पण या नवनिर्मिती मधे जो पसारा व्हायचा तो बघून माझे हात शिवशिवायला लागायचे. ऑइल पेंट्सच्या ट्यूब्स, सतराशे साठ ब्रशेस, H, B, HB अशा नानाविध पेन्सिल्स …ही यादी न संपणारी असायची. साहजिकच या सगळ्याचा पसारा पण खूप दिसायचा. पण त्यातली एकही वस्तू उचलायचीच काय पण नुसती सरकवायची पण परवानगी नव्हती मला .”तू इकडे कशाला हात नको लावू. मी सगळं नीट खुणेनी ठेवलेलं असतं. तू आवरून ठेवलंस की मला सापडत नाही.” हे बाबांचं विधान मला नेहेमीच गोंधळात टाकायचं. ‘There is a order in the chaos’ ही संकल्पना त्यांच्यामुळेच रूढ झाली असावी. त्यांच्या रागावण्याला घाबरून मी नेहेमी त्या पसाऱ्याकडे दुर्लक्ष करायची पण त्यांनी ‘खुणेनी’ ठेवलेल्या त्या वस्तू मला मात्र येताजाता सारख्या खुणावायच्या.

अजून एक निर्बंधित क्षेत्र म्हणजे माझ्या भावाचं स्टडी टेबल आणि त्याची कॉट…..त्याचे कपडे आणि बाकीच्या वस्तू यांच्या नशिबात कपाटात राहण्याचे सन्मानाचे दिवस कधी आलेच नाही. ते सगळे बिचारे निर्वासितांसारखे कधी कॉटवर तर कधी स्टडी टेबल वर पडलेले असायचे. म्हणजे बघा- रात्री झोपायच्या वेळी कॉटवरची सगळी गाठोडी स्टडी टेबल वर जायची आणि अभ्यास करायची वेळ झाली की तिथून सगळी वरात परत कॉटवर ! त्यानी कपड्यांच्या बाबतीत ‘धुवून आलेले’ आणि ‘धुवायला टाकायचे’ अशा प्रकारचा भेदभाव कधीच केला नाही. ‘घडी ही शेवटी विस्कटण्यासाठीच असते ‘ हे जीवनाचं सत्य त्याला लहान वयातच समजलं असावं ; त्यामुळे कपड्यांना इस्त्री करणं तर दूरच पण साध्या घड्या वगैरे घालायच्या भानगडीतही तो कधी पडला नाही…हळूहळू मी पण त्या बाबतीत ‘इग्नोरास्त्र’ चा वापर करायला शिकले.

आमच्या शाळेत इंग्लिश विषय शिकवायला सहस्रबुद्धे बाई होत्या- (हो, मी मराठी मीडियम मधे होते त्यामुळे आम्ही शिक्षिकाना ‘बाई’ च म्हणायचो.) मी आठवीत असतानाची गोष्ट आहे ही.. एकदा त्या आम्हांला स्वच्छता आणि टापटीप यांचं महत्व सांगत होत्या. (तेव्हाचा शिक्षकवर्ग अभ्यासाव्यतिरिक्तही बरंच काही शिकवत असे!) त्यांचं तेव्हाचं एक वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे. त्या म्हणाल्या होत्या,” जर कधी रात्री लाईट्स गेले तरी त्या अंधारात सुद्धा मला घरातली मेणबत्ती आणि काड्यापेटी अजिबात चाचपडत शोधावी नाही लागत . कारण माझ्या घरात कुठली वस्तू कुठे आहे ते मला लक्षात असतं.” त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात त्यांच्याबद्दल असलेल्या श्रद्धेला अचानक भक्तीची पण जोड मिळाली. मला जणू काही माझं ध्येय गवसलं होतं.

आणि माझ्या लग्नानंतर तर या ध्येयाची पूर्ती करायचे अनेक मौके मिळाले. दर दोन वर्षांनी (कधी कधी तर वर्षभरात सुद्धा) नवीन जागी नवऱ्याची पोस्टिंग व्हायची. त्यामुळे आधीच्या जागेचा गाशा गुंडाळून नवीन जागी पुन्हा नव्यानी बस्तान बसवणं, सगळं सामान व्यवस्थित पॅक आणि अनपॅक करणं जणू काही अगदी रुटीन झालं होतं माझ्यासाठी. पहिल्या एक दोन अनुभवांनंतरच मी सहस्रबुद्धे बाईंच्या लेव्हल ला जाऊन पोचले. प्रत्येक बॉक्स मधे ठेवलेल्या सामानाची नुसती लिस्ट बघून त्या बॉक्समधे कोणती वस्तू नक्की कुठे ठेवली आहे हे मी बरोब्बर सांगू शकत होते…अगदी बॉक्स आणि माझे डोळे दोन्ही बंद असताना सुद्धा !

पण या ठिकाणी मला एक जाहीर कबुली द्यायची आहे …माझी ही वस्तू अचूक शोधण्याची शक्ती – कशी कोण जाणे – पण पर्समधून घराची किल्ली शोधताना मात्र अचानक लुप्त होते. म्हणजे जेव्हा मी किल्ली पर्समधे ठेवते तेव्हा अगदी खुणेनी जागा हेरून ठेवलेली असते. पण जेव्हा तीच किल्ली बाहेर काढायची वेळ येते तेव्हा दोन तीन वेळा सगळी पर्स धुंडाळून सुद्धा दृष्टीला पडत नाही. आणि खास करून जेव्हा माझा नवरा शेजारी उभा असतो तेव्हा तर हमखास ती किल्ली Mr India बनून पर्समधेच कुठेतरी अंतर्धान पावलेली असते. मग नवऱ्याच्या कपाळावरच्या आठ्या आणि त्याचं ते कुत्सितपणे हसत ” जरा जास्तच जपून ठेवलीयेस वाटतं” असा टोमणा मारणं – आणि त्याचा आवाज ऐकून लगेच त्या किल्लीनी प्रकट होणं …हा निव्वळ योगायोग म्हणावा की नवरा आणि किल्ली यांनी माझ्याविरुद्ध केलेली साज़िश !! असो !!!

तसं पाहता, हा योग्य जागी योग्य वस्तू ठेवण्याचा नियम हा वस्तुं इतकाच वास्तु ला पण लागू पडतो असं वास्तुशास्त्राचा अभ्यास असणारे सांगतात. म्हणजे, स्वैपाकघर कुठे असावं, घराचं मुख्य दार कोणत्या दिशेला हवं..इतकंच काय पण अगदी पाण्याचा साठा कुठे करावा वगैरे सारख्या असंख्य गोष्टी वास्तुशास्त्रात नमूद केल्या आहेत. आणि जाणकारांच्या मते जेव्हा एखाद्या वास्तुमधे सगळं काही निर्धारित जागेवर असतं तेव्हा ती वास्तु पण खुश होऊन ‘तथास्तु’ म्हणते.

हे झालं वस्तू आणि वास्तु बद्दल! पण मला वाटतं की हे ‘keep a place for everything’ चं तत्वज्ञान आपल्या आयुष्यात अजूनही काही ठिकाणी अंमलात आणणं आवश्यक आहे.

त्यात माझ्या दृष्टीनी सगळ्यात महत्त्वाची आहेत नाती..माणूस जन्माला येण्याआधी पासूनच कितीतरी नात्यांमध्ये बांधला गेलेला असतो. ही जन्मजात नाती अनिवार्य असतात. पण तो जसाजसा मोठा होत जातो तशीतशी अजून बरीच नाती जोडत जातो…. जोपर्यंत प्रत्येक नातं ,त्या नात्याचं माणसाच्या मनातलं स्थान आणि त्या नात्याकडून असणाऱ्या त्याच्या अपेक्षा यांच्या जागा ठरलेल्या असतात तोपर्यंत ही नवीजुनी नाती त्याचं आयुष्य समृद्ध करतात. पण जेव्हा यात गल्लत होते – नात्याचं स्थान आणि पर्यायानी त्याच्या बद्दलच्या अपेक्षा बदलतात- तेव्हा हीच नाती अवजड, बोजड वाटायला लागतात. या संदर्भात मृत्युदंड सिनेमातला माधुरी दीक्षित आणि आयुब खान या दोघांवर चित्रित केलेला एक प्रसंग माझ्या अगदी लक्षात राहिला आहे…मुख्यत्वे करून त्यातल्या संवादांमुळे…..

जेव्हा ती पत्नी तिच्या पतीच्या इच्छेविरुद्ध स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचं ठरवते तेव्हा तो तिला म्हणतो,” अपना औकात में रहिये। हमरा मरद बनने का कोशिस मत किजीए।” त्यावर त्याची पत्नी ऐकवते,” औकात को ताकत का तराजू में तौलने का कोशिस मत किजीए। आप हमरा पती हैं, परमेसर बनने की भूल मत किजीए।”

खरं म्हणजे या एका प्रसंगावर एक वेगळा लेख लिहिला येईल, इतकं काही दडलंय त्या दोघांच्या वाक्यांत! पती पत्नीच्या मनातलं एकमेकांचं स्थान, त्या नात्याकडून त्यांच्या अपेक्षा ,त्या दोघांची याबद्दलची विचारसरणी आणि मनोधारणा…हे आणि असंच अजून बरंच काही ! लिहीन पुढे कधीतरी …सध्या हाती घेतलेल्या मुद्द्यांवर लक्ष देते; नाहीतर लेखातल्या मुद्द्यांची जागा चुकायची !

नात्यांबरोबर जोडलेले असतात अनुभव आणि त्या अनुभवांच्या आठवणी…काही कडू पण बऱ्याचशा गोड अशा आठवणी.आयुष्य जगताना पदोपदी या आठवणी आपल्या मनात डोकावत असतात; किती ताकद असते नाही या आठवणींमधे – या कधी उदासलेल्या मनाला उभारी देतात तर कधी एखाद्या आनंदाच्या प्रसंगात विरजण घालायचं काम करतात.या आठवणी मनात साठवून ठेवताना जर वेळीच योग्य कप्प्यांमधे नीट साठवून, रचून ठेवल्या तर ….. कडू आठवणींची जागा मनातल्या अगदी खालच्या, तळातल्या कप्प्यात …दिवा घेऊन शोधल्या तरी सापडणार नाहीत अशा ठिकाणी !

आणि गोड, हव्याहव्याशा वाटणाऱ्या आठवणी दर्शनीय कप्प्यांमधे- अगदी सहज, न शोधताही सापडतील अशा !

आणि एकदा का या अनुभवांना, या आठवणींना त्यांची योग्य जागा दाखवली की मग आपोआपच आपल्या मनातले विचार, भावना , इतरांबद्दलची आपली मतं – सगळं सगळं कसं त्यांच्या त्यांच्या योग्य जागी जाऊन बसेल . कारण या अनुभवांच्या पायावरच आपली इतरांबद्दलची मतं, भावना यांचे मजले बांधतो आपण.

जेव्हा आपल्याला ही आवराआवरी जमेल तेव्हा किती सोप्पं होईल ना या आयुष्याला सुखात, आनंदात ठेवणं !मग आपण अगदी ठामपणे म्हणू शकू..

I have a place for everything and I have managed to keep everything in place !!!

समाप्त

Advertisements

निर्णय

“या वयात हे असलं काही करणं शोभतं का बाईच्या जातीला?”

“ही असली थेरं तिकडे इंग्लंड अमेरिकेत चालतात. आपल्याकडे नाही.”

“आधुनिक विचारांच्या नावाखाली मनमानी करायची फॅशनच झालीये आजकाल !”

“दुसरा कोणीतरी भेटला असेल, म्हणून इतक्या वर्षांचं लग्न मोडून गेली – नवऱ्याला आता या वयात एकटं सोडून ..”

गेल्या काही दिवसांपासून ही आणि अशा अर्थाची वाक्यं सुरभिचा पाठलाग करत होती. तिच्या आजूबाजूचे so called ‘सुसंस्कृत’ लोक तिच्या पाठीमागे तिच्याबद्दल गॉसिप करत होते. तिच्या घरच्यांनी तिला समजवायचा खूप प्रयत्न केला होता, तिचं वागणं कसं चुकीचं आहे, समाजाच्या नियमांविरुद्ध आहे – याची तिला पदोपदी जाणीव करून दिली जात होती. पण इतकं सगळं होऊनही सुरभि मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. ‘आपण इतकं समजावून सांगूनसुद्धा काही उपयोग होत नाहीये’ हे लक्षात आल्यावर तिच्या नातेवाईकांनी,जवळच्या लोकांनी आता तिच्याशी बोलणं कमी केलं होतं.

पण सुरभिला या सगळ्याची कल्पना होतीच. तिच्या निर्णयाला सगळ्यांचा विरोध असणार हे ती पूर्णपणे जाणून होती. तरीही तिनी तो निर्णय घेतला होता. आयुष्याच्या या वळणावर इतका धाडसी निर्णय घेणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. पण गेली कित्येक वर्षं सुरभिच्याही नकळत हा विचार तिच्या मनात रुजत होता आणि मनोजचं वागणं, त्याचा स्वभाव तिच्या या विचाराला खतपाणी घालत होता… त्याचाच परिणाम म्हणून की काय पण सुरभिच्या मनात या विचारानी मूळ धरलं आणि शेवटी आज लग्नाला सव्वीस वर्षं झाल्यानंतर तिनी मनोज पासून वेगळं होण्याचं ठरवलं.

तिनी जेव्हा हा विचार मनोजला सांगितला तेव्हा तिचं म्हणणं हसण्यावारी नेत त्यानी म्हटलं होतं,” असले फालतू जोक्स नको करू यापुढे.” आणि त्याला कारणही तसंच होतं.सुरभि आणि मनोजच्या लग्नाला सव्वीस वर्ष झाली होती. आणि इतक्या वर्षांत त्यांच्यात कधीच भांडण किंवा वैमनस्य आलं नव्हतं…हां, छोटे मोठे वादविवाद, रुसवे फुगवे अशी चहाच्या कपातली वादळं चालायची अधूनमधून ! पण त्यांचं स्वरूप इतकंही गंभीर नव्हतं की त्यामुळे आज इतक्या वर्षांनंतर सुरभिच्या मनात वेगळं होण्याचा विचार यावा.

तसं पाहता त्या दोघांचा संसार अगदी दृष्ट लागण्यासारखा होता. दोघंही रंगरूपात एकमेकांना साजेसे होते. मनोज एका चांगल्या कंपनीत महत्वाच्या हुद्द्यावर काम करत होता. सुरभिचा बेकरी प्रॉडक्ट्सचा घरगुती व्यवसायही जोरात सुरू होता. लग्नानंतर तिनी तिची स्वतःची cake shop सुरू करावी अशी मनोजची अगदी मनापासून इच्छा होती. त्यासाठी लागणारी सगळी मदत करायलाही तो तयार होता, पण सुरभि तिच्या घरगुती व्यवसायातच खुश होती. आपल्या निर्णयाचं स्पष्टीकरण देताना ती म्हणाली होती,”आत्ता आपण दोघंच आहोत, पण पुढे जेव्हा आपल्याला मुलं होतील तेव्हा माझा बराचसा वेळ त्यांना सांभाळण्यात जाईल, आणि म्हणूनच माझा हा व्यवसाय मला घरगुती स्वरूपातच ठेवायचा आहे. लाईफच्या प्रत्येक स्टेजमधे एका स्त्रीच्या priorities बदलत असतात. आणि मला त्या प्रत्येक स्टेजमधे माझं 100% द्यायचं आहे.”

तिचं हे बोलणं, इतके स्पष्ट विचार ऐकून मनोजला तिचा खूप अभिमान वाटला होता. ‘मी अगदी योग्य साथीदाराची निवड केली’ या विचारानी तो सुखावला होता.

सुरभि होतीच तशी..समोर आलेल्या परिस्थितीप्रमाणे स्वतःला adjust करून घेणारी, तशी खूप भावनाप्रधान पण एखाद्या कठीण प्रसंगी तितकीच हिम्मत दाखवणारी. जेव्हा मनोज कामानिमित्त दीर्घकाळासाठी बाहेर असायचा तेव्हा सगळं घर ती single handedly मॅनेज करायची..मुलीची शाळा,अभ्यास, तिच्या केक ऑर्डर्स, नातेवाईक, पाहुणे सगळं …आणि म्हणूनच हळूहळू मनोजचं घरातलं लक्ष कमी होत गेलं आणि सगळ्या घराचा भार एकट्या सुरभिवर येऊन पडला. पण तिनी याबाबतीत कधीच कुठली तक्रार नाही केली. तिला तिच्या priorities माहित होत्या. सुरभि जितकी घरात गुंतत गेली तितकाच मनोजही तिच्या प्रेमात बुडत गेला.

‘हम दो, हमारी एक’ असा त्यांचा आखीव रेखीव संसार होता. वर्षभरापूर्वीच त्यांच्या मुलीचंही लग्न झालं होतं. सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या संपल्या होत्या आणि गेल्या काही दिवसांपासून मनोज त्यांच्या सेकंड हनिमूनची प्लॅंनिंग करत होता. पुढच्या महिन्यात सुरभिच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्तानी तिला हेच सरप्राईज गिफ्ट देणार होता तो.

पण त्याआधी सुरभिनीच त्याला हे असं धक्कादायक सरप्राईज दिलं होतं.. तिला divorce हवा होता.

“अगं, पण असं अचानक काय झालं ? माझं काही चुकलं का? तुझ्या मनाविरुद्ध काही झालंय का?इतक्या वर्षांचा आपला सुखी संसार…. आपण दोघांनी एकत्र सुरू केला होता ना..मग तू अशी मधेच मला एकट्याला सोडून का जातीयेस ?” मनोजनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

“चुकतोयस तू मनोज.मी तुला सोडून नाही चालले, तूच हळूहळू मला स्वतःपासून दूर केलंयस.आपला हा संसार जरी आपण दोघांनी सुरू केला असला तरी त्याला पूर्णत्वाला मी पोचवलंय. आपल्या घरासाठी खस्ता मी खाल्ल्या आहेत.तू फक्त दूर उभा राहून प्रोत्साहन दिलं आहेस. पण खरं सांगू ..मला तुझं नुसतं प्रोत्साहन नको होतं, तुझा सक्रिय सहभाग हवा होता.”

“हे तुझं म्हणणं अगदी चुकीचं आहे सुरभि.. मागच्या सव्वीस वर्षांत कितीतरी प्रसंग असे आले होते की ज्यावेळी तू अडचणीत सापडलेली असताना मी तुला त्यातून बाहेर काढलं आहे. जेव्हा जेव्हा कोणी तुझ्या विरुद्ध काही बोलले तेव्हा मी वेळप्रसंगी त्यांच्याशी भांडलो देखील आहे..माझ्याकडून शक्य होणारी सगळी मदत केलीये मी तुला…” मनोज आपली बाजू मांडत म्हणाला.

“Exactly, मी पण हेच म्हणतीये..तू फक्त मला मदत केलीस आणि ती सुद्धा जेव्हा मी अडचणीत आहे असं तुला जाणवलं तेव्हाच….तू मला माझ्या प्रत्येक निर्णयात सपोर्ट केलंस हे मला अगदी मान्य आहे.. पण जेव्हा एखादा निर्णय घ्यायची वेळ यायची तेव्हा तू कुठे असायचास मनोज? खरं म्हणजे त्यावेळी मला तुझी साथ हवी असायची..संसार हा दोघांचा असतो ना ? मग निदान महत्वाचे निर्णय तरी दोघांनी मिळून, तोलून मापून घ्यायला हवे ना? पण ‘तुला जे योग्य वाटेल ते कर’ असं म्हणून तू प्रत्येक वेळी सगळी सूत्रं माझ्या हातात द्यायचास.

तू कायम माझ्या पाठीशी उभा असायचास.. मी अडखळले, ठेचकाळले तर मला सावरून घ्यायचास…सगळं सगळं मान्य आहे..पण मला तू माझ्या बरोबर हवा होतास…पुढे किंवा पाठीमागे नाही….तुझा हात हा नेहेमी फक्त माझ्या मदतीसाठीच पुढे यायचा..आणि इतर वेळी ? मनोज, मला आयुष्याच्या बहारदार रस्त्यांवरून चालताना देखील तुझी साथ हवी होती..माझ्या हातांत गुंफलेले तुझे हात हवे होते.. संकटांचे काळे ढग असतानाच नाही तर सप्तरंगी इंद्रधनुष्य असतानाही मला तू बरोबर हवा होतास.” सुरभि एकटक खिडकीतून बाहेर बघत आपल्याच तंद्रीत बोलत होती.

“पण तुला माझ्या मदतीची गरजच नव्हती ना कधी !! तू स्वतःच सगळं किती व्यवस्थित सांभाळून घेतेस नेहेमी, मग उगीच मधे मधे माझी लुडबुड कशाला म्हणून मी….”बोलता बोलता मनोज मधेच अडखळला.. त्याच्याही नकळत तो सुरभिच्या विचारांना दुजोरा देत असल्याचं जाणवलं त्याला.

त्याच्याकडे रोखून बघत सुरभि म्हणाली,”पटतंय ना तुला पण – की तुझ्यावाचून माझं काही अडत नाही ?”

सुरभिचा असा सडेतोड प्रश्न ऐकून मनोज क्षणभर गांगरला पण तिनी समोर आणलेलं सत्य स्वीकारायची त्याची हिम्मत होत नव्हती. त्याला काय उत्तर द्यावं तेच सुचेना. आणि खरं सांगायचं तर सुरभिला त्याच्या उत्तरात काडीचाही इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे ती पुढे म्हणाली, “खरा प्रॉब्लेम कुठला आहे सांगू ? या नात्याबद्दलच्या आपल्या दोघांच्या अपेक्षा …. मला तुझ्या रुपात एक soulmate हवा होता….पण तू मात्र फक्त माझा लाईफ पार्टनर बनून राहिलास ! आणि त्यात भर म्हणजे – तू नेहेमीच मला गृहीत धरलंस.”

सुरभि आपल्याच नादात बोलत होती. इतकी वर्षं मनात साठलेलं मळभ हळूहळू दूर होत होतं. “तुला आठवतंय मनोज मी लग्नानंतर तुला म्हणाले होते की – लाईफच्या प्रत्येक स्टेजमधे एका स्त्रीच्या priorities बदलत असतात. आणि मला त्या प्रत्येक स्टेजमधे माझं 100% द्यायचं आहे.

आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्टेज मधे मी माझं 100% दिलं- माझा प्रत्येक रोल मी इमाने इतबारे निभावला ..आई, सून,जाऊ, नणंद,मावशी,काकू,आत्या…आणि या सगळ्यांपेक्षा खास, अगदी स्पेशल असा पत्नी चा रोल सुद्धा! आणि त्याहून महत्वाचं म्हणजे हे सगळं मी एकटीनीच मॅनेज केलं..

पण आता आयुष्याच्या या वळणावर माझी priority काय असायला हवी याची जाणीव झालीये मला…आता मी माझ्यासाठी जगणार आहे.. आणि अर्थातच त्यासाठी मला तुझी गरज नाही लागणार..तुझ्याच शब्दांत सांगायचं तर उगीच तुझी ‘लुडबुड’ कशाला ? म्हणूनच मी आता वेगळं राहायचं ठरवलं आहे..हा निर्णय घेताना मुद्दामच तुला विचारलं नाही… तशी गरजच नाही वाटली..कारण तू म्हणतोस तसं यावेळीही मी मला जे योग्य वाटलं तेच केलंय .”

एवढं बोलून सुरभि त्या खोलीतून आणि मनोजच्या आयुष्यातून कायमची निघून गेली. इतकी वर्षं सुरभिच्या मनात दाटून आलेलं मळभ आता मनोजच्या मनाला आपल्या कवेत घेत होतं.

-समाप्त-

अर्थ

रखरखीत उन्हाळ्यातली एक घामेजलेली दुपार..चार- साडेचार चा सुमार असावा.मी माझ्या पुस्तकांच्या दुकानात बसले होते. काचेच्या बंद दारामुळे आतली AC ची हवा सुखद गारवा देत होती. दुकानात माझा स्टाफ सोडला तर मोजकेच लोक होते.. कोणी पुस्तकांच्या शेल्फस च्या पुढेमागे उगीच फेऱ्या मारत होते तर कोणी उगीचच एखादं पुस्तक उचलून त्याची पानं उलटायचा दिखावा करत होते..त्यांच्यापैकी एकालाही पुस्तकांमधे काडीचाही इंटरेस्ट नाहीये हे न सांगताही कळत होतं…त्या सगळ्यांचा मुख्य उद्देश एकच होता- ‘दुकानातल्या AC ची हवा खाणे’ ! मला त्यांची ही strategy चांगलीच माहीत होती. कारण रोज त्यांच्यासारखेच कोणी ना कोणी so called पुस्तकप्रेमी दुपारच्या वेळात माझ्या दुकानात रेंगाळत असत.

संतोष- माझा cashier मात्र उगीचच चुळबुळत होता..”ताई , त्यांना सांगू का ‘उगीच पुस्तकं हाताळू नका .पानं खराब होतायत’ म्हणून ?”

“राहू दे रे.. थोडं ऊन कमी झालं की जातील आपोआप सगळे.” मी त्याला शांत करत म्हणाले.

“अहो, पण फुकटची गार हवा खातायत सगळे फुकटे,” तो अजून वैतागून म्हणाला.

“जाऊ दे रे. घरी आलेल्या पाहुण्यांकरता आपण फॅन किंवा ac लावतोच ना ! तसं समज.. आणि तसंही आपण काही मुद्दाम त्यांच्यासाठी ac ऑन केलाय का ? नाही ना ! त्यामुळे तू उगीच डोकं तापवू नको. ”

आमचं दोघांचं बोलणं चालू असतानाच एक पाच सहा वर्षांची मुलगी दुकानाचं दार ढकलून आत शिरली. तिच्या मागोमाग एक मध्यमवयीन स्त्री देखील होती – बहुदा तिची आई असावी. ती मुलीला हळू आवाजात काहीतरी समजावत होती, पण मुलगी मात्र तिचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसावी. आपल्या आईचं बोलणं ऐकत असताना एकीकडे तिची हळवी नजर सगळ्या दुकानात फिरत होती. जणूकाही कोणाला तरी शोधत होती. बाहेरच्या उन्हामुळे तिचा चेहरा लाल झाला होता, कानशिलावरून घामाच्या धारा ओघळत होत्या… तिची आई तिचा घाम पुसत होती; पर्स मधून पाण्याची बाटली काढून तिला देत होती- पण त्या गोड गोंडस मुलीचं तिकडे लक्षच नव्हतं. अचानक तिची ती भिरभिरती नजर माझ्यावर येऊन थांबली आणि तिच्या चेहेऱ्यावर ओळखीचं हसू फुललं. ती लगबगीनी माझ्या दिशेनी यायला निघाली. पण तिच्या नजरेतली ती ओळख बघून मी मात्र पुरती गोंधळले. माझ्या मेंदूतल्या ओळख विभागात अचानक खळबळ माजली….ती मुलगी किंवा तिची आई यांच्यापैकी कोणाला आधी भेटल्याची कुठे काही नोंद आढळतेय का हे बघण्यासाठी ! मेंदूच्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या फाईल्स चेक झाल्या पण काही हिंट मिळत नव्हती. माझ्या डोक्यात चाललेला गोंधळ माझ्या चेहेऱ्यावर दिसू नये म्हणून मी जरा जास्तच हसत त्या दोघींच्या दिशेनी जायला निघाले. त्या गोडुली कडे बघत विचारलं,” काय हवंय आमच्या या परी राणीला? गोष्टींची पुस्तकं का आर्ट अँड क्राफ्ट चं सामान?” माझ्या जवळ येत ती गोडुली मला म्हणाली,” काकू, अहो ते सगळं तर मी कालच घेऊन गेले होते.” तिचं ते वाक्य ऐकलं आणि मेंदूतल्या सगळ्या तारा एकदम जोडल्या गेल्या …’ अरेच्चा! ही मुलगी तर काल संध्याकाळी आली होती दुकानात. आणि बरीच पुस्तकं वगैरे घेऊन गेली होती. किती खुश दिसत होती ती जाताना.. एक वेगळीच चमक होती तिच्या डोळ्यांत….आत्ता आठवलं!’

“मग आज काय डिमांड आहे मुलीची?” तिच्या आईकडे बघत मी म्हणाले. त्यावर काहीच उत्तर न देता तिची आई कसनुसं हसली . का कुणास ठाऊक पण तिच्या त्या हसण्यात एक प्रकारची असहायता आणि विषण्णता जाणवली मला ! मी पुढे काही विचारणार इतक्यात माझा हात ओढत माझी परी मला म्हणाली,” काकू, काल मी हे पुस्तक नेलं होतं ना त्यात चुकीची माहिती दिली आहे. म्हणून मला हे पुस्तक बदलून दुसरं पुस्तक पाहिजे.”

तिचं बोलणं ऐकून तिच्या आईच्या डोळ्यांत पाणी तरळलं ..ते बघून मी अजूनच बुचकळ्यात पडले.

तिची आई म्हणाली,”सॉरी मॅडम, तुम्हांला उगीच त्रास देतीये. पण अहो, मी हिला किती समजावलं पण हिला पटतच नाहीये. आता तुम्हीच सांगा तिला.” हे म्हणत असताना तिच्याही नकळत दोन अश्रू खळ्ळकन् तिच्या गालावर ओसंडले. माझी नजर तिच्या मुलीकडे गेली. आईला रडताना बघून साहजिकच ती भांबावून गेली असावी .कारण ती एकदम हिरमुसली आणि आईच्या मागे जाऊन उभी राहिली …खाली मान घालून, आपली नाराजी लपवण्याचा प्रयत्न करत !!

हे प्रकरण दिसतंय त्यापेक्षा गंभीर असल्याचं मला जाणवलं. मी संतोष ला सांगून त्या बाईंकरता सरबत मागवलं, त्यांना बसायला सांगितलं आणि मी माझ्या परीचा हात धरून तिला पुस्तकांच्या शेल्फस् च्या दिशेनी घेऊन गेले. का कोणास ठाऊक पण मला वाटत होतं की तिच्या आईसमोर कदाचित ती आपल्या मनातलं बोलू शकणार नाही. तिथल्या एका लाकडी स्टुलावर बसत तिला जवळ घेऊन विचारलं ,”आता सांग बाळा.. कुठलं पुस्तक बदलून पाहिजे तुला ?” माझा प्रश्न ऐकताच तिची कळी खुलली. तिच्या बॅग मधून एक पुस्तक काढत ती म्हणाली,”हे बघा.. यात चुकीची माहिती दिलीये.” बघितलं तर ती छोटी ऑक्सफर्ड डिक्शनरी होती. तिच्या समाधानाकरता मी उगीचच त्यातली काही पानं चाळून बघितली. “पण याच्यात तर नुसते शब्दांचे अर्थ आहेत.. ” मला मधेच थांबवत ती म्हणाली,” तेच तर ! चुकीचा अर्थ दिलाय यात.”

आता माझ्या मनातल्या गोंधळाची जागा कुतूहलानी घेतली होती. तिच्या कपाळावरची घामेजलेली केसांची बट बाजूला सारत मी विचारलं,” असं का वाटतंय तुला ? काय झालं सांग बरं नीट.”

आपलं म्हणणं ऐकून घ्यायला कोणीतरी तयार आहे हे कळल्यावर तिला एकदम हुरूप आला. तिनी मला समजावून सांगायला सुरुवात केली..” अगं काकू, माझी आई जेव्हा हॉस्पिटल मधून छोटूसं बाळ घेऊन आली होती ना, तेव्हा माझे बाबा पण आले होते घरी. आम्ही सगळ्यांनी कित्ती मज्जा केली होती. पण मग एक दिवस बाबा मला म्हणाले की त्यांना आता परत जायला लागणार कारण त्यांची सुट्टी संपली. पण मला अजून बाबांबरोबर खूप खेळायचं होतं, त्यांना माझ्या शाळेत घेऊन जायचं होतं. माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींचे आईबाबा येतात शाळेत, पण माझी फक्त आईच येते नेहेमी. आणि मग माझा वाढदिवस पण होता ना …मला बाबांना केक खायला द्यायचा होता. त्यांच्याबरोबर नवीन फ्रॉक मधे खूप फोटो पण काढायचे होते. म्हणून मी त्यांना म्हणाले की ‘तुम्ही नंतर जा’. तर ते काय म्हणाले माहितीये ?”

माझ्याकडे उत्तराच्या अपेक्षेनी बघत तिनी विचारलं.

“काय म्हणाले?” मीही तेवढीच उत्सुकता दाखवत विचारलं.

दोन पावलं पुढे येत परी म्हणाली, “बाबा म्हणाले ‘ मी पुढच्या वेळी येईन तेव्हा तू म्हणशील ते सगळं करू या , ok ?’ मग आम्ही दोघांनी मिळून एक लिस्ट बनवली..बाबा परत आल्यावर काय काय करायचं त्याची…..आम्ही सगळ्यांनी मिळून पिकनिकला जायचं, आईबाबांनी मिळून माझ्या शाळेत यायचं, माझ्या बक्षीस समारंभाला पण यायचं, माझ्या आणि बाळाच्या वाढदिवसाला आमच्यासाठी खूप गिफ्ट्स आणायची….आणि तुला माहितीये का …त्या लिस्ट मधे प्रत्येक ठिकाणी बाबांनी लिहिलं ‘YES’,’YES’,’YES’…..” बोलता बोलता ती अचानक गप्प झाली.

मी म्हटलं ,” वा! मज्जाच आहे की मग !! पण या सगळ्याचा आणि हे पुस्तक बदलून घेण्याचा काय संबंध आहे ?”

“तेच तर,” आता परीच्या डोळ्यांतही पाणी तरळत होतं. “मला आई म्हणाली होती की या पुस्तकात सगळ्या इंग्लिश शब्दांचे मराठीतून अर्थ सांगितले आहेत. म्हणून मी काल जेव्हा याच्यात ‘YES’ चा अर्थ बघितला तर त्याच्यासमोर लिहिलं होतं ‘होय’ …..

तिला मधेच थांबवत मी म्हणाले,” अगं, मग बरोबरच आहे ना हा अर्थ ? YES म्हणजे ‘होय’…. ”

त्यावर रडवेला चेहेरा करून परी म्हणाली,” नाही गं काकू…YES म्हणजे ‘होय’ नसतं…. YES चा अर्थ असतो ‘कधीच नाही’…..”

माझ्याही नकळत मी बोलून गेले,”हे कोणी सांगितलं तुला?”

त्यावर ती डोळे पुसत म्हणाली,” मला माहितीये ..कारण आईनी मला सांगितलंय की आता माझे बाबा कधीच परत येणार नाहीयेत. ते आमच्या पासून खूप लांब वर देवाकडे गेलेत. म्हणजे आता आमच्या लिस्ट मधे त्यांनी जे YES ,YES असं लिहिलं होतं ते सगळं आम्ही कधीच नाही करू शकणार… बघ.. म्हणजे YES चा अर्थ ‘होय’ नाहीये…YES म्हणजे ‘कधीच नाही’ !!!”

चुकीचं पुस्तक आहे हे…मला खरा अर्थ असलेलं पुस्तक पाहिजे!!!”

तिचं बोलणं ऐकून मी सुन्न झाले. बोलायला शब्दच सुचेनात. डोळ्यांत येणारं पाणी परतवत मी तिला माझ्या कुशीत ओढून घेतलं.

समाप्त

माझी सैन्यगाथा (भाग २३)

११नोव्हेंबर १९९८…अजूनही लक्षात आहे मला ती तारीख ! त्याच दिवशी DSSC मधे फील्ड मार्शल मनेकशॉ यांचं भाषण होतं. विषय होता- ‘Leadership and Discipline’ ..

तसं पाहता त्या कोर्सच्या दरम्यान वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज येऊन कोर्स करणाऱ्या ऑफिसर्स ना संबोधित करायचे. पण अगदी मोजक्याच वेळी आम्हां लेडीज ना पण आमंत्रित केलं जायचं. कारण मोस्टली सगळी भाषणं ही त्यांच्या अभ्यासाशी निगडित असायची. पण luckily फील्ड मार्शल मनेकशॉ यांचं भाषण ऐकायला आम्हांला सुद्धा परवानगी होती.

त्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच माझी उगीचच धावपळ चालू होती. एक वेगळाच उत्साह जाणवत होता. मी फील्ड मार्शल मनेकशॉ यांच्याबद्दल बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं – मुख्य म्हणजे प्रत्येक वेळी त्यांची फक्त आणि फक्त तारीफ च कानावर आली होती. आणि म्हणूनच आता त्यांना प्रत्यक्ष बघायची आणि ऐकायची संधी मिळाल्यामुळे मला ‘कधी एकदा auditorium मधे जाऊन पोचते’ असं झालं होतं.

मी अगदी सुपरफास्ट स्पीडनी घरातली सगळी कामं हातावेगळी केली आणि कॉलेज auditorium च्या दिशेनी धाव घेतली. वेळेच्या अर्धा तास आधीच जाऊन पोचले मी तिथे. ठरलेल्या वेळी आम्हांला सगळ्यांना आत सोडण्यात आलं. सगळे ऑफिसर्स आणि आम्ही सगळ्या लेडीज स्थानापन्न झालो. सभागृह अगदी खचाखच भरलं होतं. पण इतके सगळे लोक असूनही कुठलाही गलका किंवा गोंधळ नव्हता. सगळं कसं अगदी शिस्तबद्ध पद्धतीनी चाललं होतं. प्रत्येक जण अगदी आतुरतेनी मुख्य अतिथींची वाट बघत होता. पुढच्या काही मिनिटांतच माईक वरून announcement झाली ….नकळत आमच्या सगळ्यांच्या नजरा मुख्य दाराच्या दिशेनी वळल्या आणि फील्ड मार्शल मनेकशॉ यांच्या सन्मानार्थ आम्ही सगळे उभे राहिलो. पुढच्या क्षणी स्टेज च्या दिशेनी झपाझप पावलं टाकत जाणारे फील्ड मार्शल दिसले. चेहेऱ्यावर मंदस्मित ठेवून ते दोन्ही बाजूला उभ्या असणाऱ्या सगळ्या लोकांच्या शुभेच्छा तितक्याच आदरानी स्वीकारत होते .वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षीही एखाद्या तरुणाला लाजवेल अशी चपळ चाल..पण त्यातही कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही … सगळं कसं अगदी संयत …त्यांना प्रत्यक्ष बघितल्यावर माझ्या मनात पहिला विचार आला तो म्हणजे..”He is a ‘no nonsense’ man…. A true officer and a thorough gentleman.” माझी अवस्था तर अगदी ‘अजी मी ब्रम्ह पाहिले’ अशीच झाली होती.

त्यानंतर जवळजवळ एक दीड तास ते बोलत होते आणि आम्ही सगळे ऐकत होतो. सलग इतका वेळ एका जागी उभं राहून बोलणं आणि तेही त्या वयात !!! आणि समोरचा श्रोतृवर्ग ही तसाच खास…त्यांच्यासारखाच देशभक्तीनी प्रेरित असलेला.. समोर बसलेला प्रत्येक ऑफिसर discipline आणि leadership ही दोन मूल्यं कोळून प्यायलेला असताना पुन्हा त्याच विषयावर त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्याच मूल्यांची पुन्हा नव्यानी ओळख करून देणं….त्याला पाहिजे जातीचे – ते येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे !!!!

तशा काहीशा रटाळ वाटणाऱ्या या विषयाला देखील त्यांनी इतकं इंटरेस्टिंग बनवलं. त्यांच्या अथांग अनुभवसागरातून काही निवडक अनुभव त्यांनी इतक्या खुमासदार पणे सांगितले. भाषेवरची जबरदस्त पकड आणि अफलातून sense of humour यांच्या जोरावर त्यांनी आम्हां सगळ्यांना अक्षरशः आमच्या खुर्च्यांवर खिळवून ठेवलं होतं.

मी घरून निघताना बरोबर एक नोट पॅड आणि पेन ठेवलं होतं- त्यांच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे टिपून घ्यायला ….पण ऐनवेळी मी इतकी मंत्रमुग्ध झाले की लिहिणं वगैरे सगळं विसरून गेले. पण आत्ता जेव्हा तो अनुभव तुम्हां सगळ्यांबरोबर शेअर करायचं ठरवलं तेव्हा सहज गुगल वर शोधलं आणि चक्क चक्क मला त्या दिवशीचं त्यांचं ते संपूर्ण भाषण सापडलं . नुसतं भाषणच नाही तर त्यानंतर झालेली प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण ही मिळाली मला. ते सगळं जसंच्या तसं इथे पोस्ट करते आहे.

https://drive.google.com/file/d/1bmxNWbtodUbH0DyyurFlH862yma9ngcY/view?usp=drivesdk

तुम्हांला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरूर हे भाषण वाचा. मला खात्री आहे माझ्यासारखंच तुमचंही आयुष्य समृद्ध होईल.

क्रमशः

माझी सैन्यगाथा (भाग २२)

ठरल्याप्रमाणे आम्ही चार पाच मैत्रिणी मिळून एक दिवस केत्ती ला जायला निघालो. रानी अम्माच्या मते आम्हाला साधारण अर्धा पाऊण तास लागणार होता केत्ती ला पोचायला , पण त्या दिवशी आम्ही ज्या मैत्रिणीच्या कार मधून जाणार होतो ती स्वतः एक कमर्शियल पायलट आहे. आणि गंमत म्हणजे ती कार ला पण विमान समजूनच चालवते… आम्ही ज्या स्पीडनी रस्त्यावरचे चढ उतार आणि वळणं मागे टाकत जात होतो ते बघताना एक दोन वेळा मला खरंच विमानात बसल्यासारखं वाटलं होतं. तेव्हा एक मजेशीर विचार मनात आला..महाभारतात जसा धर्मराजाचा रथ जमिनीपासून दोन बोटं वर- हवेत- चालायचा तशीच आमची गाडी पण बहुदा हवेतच चालली होती !! शेवटी एकदाच्या आम्ही सगळ्या सुखरूप पणे आमच्या इच्छित स्थळी पोचलो. पण अपेक्षेपेक्षा लवकरच..त्यामुळे ते ठराविक दुकान अजून उघडलं नव्हतं. मग थोडा वेळ तिथेच जवळपास रेंगाळत आजूबाजूचं निसर्गसौंदर्य माझ्या कॅमेरात साठवून घेतलं

काही वेळानी त्या दुकानाची मालकीण आली आणि आम्ही सगळ्या तिच्या मागोमाग दुकानात शिरलो.माझ्या एक दोन मैत्रिणी अगदी पूर्ण तयारीनिशी आल्या होत्या…म्हणजे अगदी त्यांना कुठल्या रंगाची साडी हवी आणि तिच्यावर कोणतं डिझाइन , आणि त्याची रंगसंगती सुद्धा बरं का! हे सगळं तिला समजावून सांगण्यात त्या busy झाल्या. मला तसाही साड्या वगैरे मधे फारसा इंटरेस्ट नव्हता त्यामुळे मी त्या दुकानातल्या इतर वस्तू न्याहाळत फिरत होते. माझ्या अपेक्षेप्रमाणे तिथे टेबल लिनन ची खूप व्हरायटी होती…आणि बेड लिनन पण ! इतकं नाजूक भरतकाम ..किती सुबक आणि देखणं !! आणि तितकंच सफाईदार पण…म्हणजे जर नीट लक्ष देऊन बघितलं नाही तर एखाद्याला ‘कपड्याची सुलट आणि उलट बाजू कोणती ?’ हा प्रश्न पडावा.त्यातलं एक बेड स्प्रेड आणि एक टेबल रनर मला फार आवडले.. त्याबद्दल विचारलं तेव्हा असं कळलं की ते ‘by order’ कोणीतरी बनवून घेतले होते.. मन थोडं खट्टू झालं, पण मग मी अगदी तसंच माझ्यासाठी सुध्दा बनवायला सांगितलं. त्यावर ती दुकानवाली म्हणाली,” आत्ता वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे मॅम. तुमची ऑर्डर पूर्ण व्हायला पाच सहा महिने तरी लागतील..सध्या साड्यांच्या खूप ऑर्डर्स आहेत ना,त्यामुळे!” हे ऐकल्यावर तर माझा मूडच गेला. एकदा वाटलं की ऍडव्हान्स देऊन ऑर्डर बुक करावी…पण पाच सहा महिने !! का कोण जाणे पण मी ठरवलं की नंतर परत एकदा येऊन ट्राय करायचं..

पण ती ‘नंतर’ ची वेळ काही आली नाही आणि त्यामुळे माझं परत केत्ती ला जाणं झालंच नाही. असो!!! माझ्या Must Buy लिस्ट मधली एक वस्तू जरी राहून गेली असली तरी Must See मधे केत्ती च्या समोर ✔️ लागल्यामुळे मी त्यातच समाधान मानून घेतलं.

आता लिस्ट मधे पुढचं नाव होतं ‘तिरुपुर’ ! हे एक छोटंसं गाव (म्हणजे तेव्हा तरी छोटंसं होतं ) आहे ..कोईम्बतूर च्या जवळ…..hosiery च्या कपड्यांसाठी प्रसिद्ध ! म्हणजे अगदी तान्ह्या बाळाच्या अंगड्या-टोपड्या आणि nappies पासून ते मोठ्या माणसांच्या ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टस पर्यंत …सगळं काही आहे इथे. त्याचबरोबर पायपुसणी, सतरंज्या, कार्पेट्स, बेड साईड मॅट्सची पण खूप व्हरायटी मिळते. थोडक्यात काय तर hosiery चं one stop shop आहे तिरुपुर ! आणि दुधात साखर म्हणजे…सगळ्या वस्तू अगदी whole sale rate मधे.. फक्त तुमच्याकडे वेळ आणि patience हवा !!

एका रविवारी आम्ही तिघंही (मी, नितीन आणि ऐश्वर्या) सकाळी लवकर निघून तिरुपुर ला पोचलो. तिथल्या त्या whole sale market मधे गेल्यावर माझी अवस्था तर अगदी ‘घेता किती घेशील दो करांनी’ अशी झाली होती. खरं म्हणजे, मी जेव्हाही कोणतीही खरेदी करायला जाते ना तेव्हा नेहेमी माझी शॉपिंग लिस्ट माझ्याकडे तयार असते. आणि मी फक्त त्या लिस्ट प्रमाणेच शॉपिंग करते. उगीचच -‘आवडलं म्हणून…स्वस्त वाटलं म्हणून…’ अशी कारणं देत जास्तीचं कोणतंही सामान मी कधी घेत नाही. पण त्या दिवशी मात्र मी स्वतःच माझा नेहेमीचा निर्धार गुंडाळून ठेवला आणि अक्षरशः अधाश्यासारखी शॉपिंग केली. त्यात मुख्यत्वे ऐश्वर्या साठी कपडे आणि घरासाठी कार्पेट्स वगैरे यांचा समावेश होता. त्यानंतर तिथे आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना आम्ही अगदी आवर्जून तिरुपुर ला घेऊन गेलो.

एकदा रानी अम्माशी बोलताना कळलं की ‘दिल से’ सिनेमातल्या ‘छैंय्या छैंय्या..’ या गाण्याची शूटिंग निलगिरी टॉय ट्रेन वर झाली आहे आणि त्यात जो रेल्वे ब्रिज दाखवला आहे तो वेलिंग्टन मधेच आहे. त्या दिवसांत ऐश्वर्या (माझी मुलगी) शाहरुख खान ची जबरदस्त फॅन होती..मग काय , एक दिवस आमची वरात त्या ब्रिजच्या दिशेनी निघाली.

आम्ही ब्रिज बघून घरी आलो पण ‘तिथे शाहरुख खान दिसला नाही’ म्हणून ऐश्वर्या मात्र खूप निराश झाली.

वेलिंग्टन मधला तो एक वर्षाचा काळ अशा बऱ्याच आठवणींनी आणि अनुभवांनी समृद्ध झाला होता असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण त्या सगळ्या आठवणींत एक अतिशय स्पेशल, अविस्मरणीय असा अनुभव मला मिळाला… आणि तो म्हणजे फील्ड मार्शल सॅम मनेकशॉ यांना ‘याचि देही याचि डोळा’ बघायची आणि त्यांचं भाषण ऐकायची सुवर्णसंधी मिळाली मला!!!

क्रमशः

माझी सैन्यगाथा (भाग २१)

एका सोमवारी नवरा आणि मुलगी यांची पाठवणी केल्यानंतर मी माझ्या स्कूटरवर आरूढ होऊन कून्नूरच्या दिशेनी कूच केलं.आमचं घर डोंगरमाथ्यावर असल्यामुळे कुठल्याही कामासाठी बाहेर पडताना अगदी एखाद्या मोहिमेसाठी गडउतार होत असल्याची फीलिंग यायची. त्यात भर म्हणजे मी पुण्याची असल्यामुळे चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळल्याशिवाय स्कूटर चालवण्याचा अपराध माझ्या हातून होणे नाही…..स्कार्फ च्या बरोबर माझा सनकोट, हॅन्ड ग्लोव्हज आणि हेल्मेट असा सगळा जामानिमा केल्यावर अगदी युद्धासाठी चिलखत आणि शिरस्त्राण घालून सज्ज झाल्यासारखं वाटायचं. त्या दिवशीही मी अशीच तयार होऊन ‘Crown Bakery’ ला भेट द्यायला निघाले.

त्या दिवसांत gps फारसं प्रचलित नसल्यामुळे एखादी जागा किंवा पत्ता शोधण्यासाठी आम्ही न लाजता रस्त्यावरच्या लोकांना विचारायचो आणि मुख्य म्हणजे ते ही तितक्याच उत्साहानी मदत करायचे !!

पण मला जास्त कोणाला विचारायची किंवा शोधाशोध करायची गरजच नाही भासली. पहिल्या प्रयत्नातच यश मिळालं..In fact, जेव्हा मी एका माणसाला “Crown Bakery किधर है?” असं विचारलं तेव्हा त्यानी ज्या दयाभूत नजरेनी माझ्याकडे पाहिलं ना…जणू काही तो म्हणत होता,”हे अज्ञानरुपी अंधःकारात चाचपडणाऱ्या बालिके, तुला crown बेकरी शोधायची गरज पडावी !” पण तरीही शक्यतो नॉर्मल चेहेरा ठेवत माझ्या त्या उद्गारकर्त्यांनी मला उचित मार्ग दाखवला आणि पुढच्या काही मिनिटातच मी माझ्या इच्छित स्थळी जाऊन पोचले. रस्त्याच्या कडेला स्कूटर पार्क करून समोर पाहिलं…आणि एका घरवजा दिसणाऱ्या ब्रिटिश काळच्या इमारतीवर मोठा बोर्ड दिसला…

CROWN BAKERY

(ESTD 1880)

बरंच काही ऐकलं होतं या बेकरी बद्दल ! (अर्थातच pck !!) १८८० साली मोहम्मद शरीफ नावाचे एक सद्गृहस्थ हैदराबाद हून कून्नूर ला आले आणि त्यांनी ही बेकरी सुरू केली. प्रथमदर्शनी जरी ही बेकरी अगदी साधी, इतर कोणत्याही बेकरी सारखी दिसत असली तरी तिचा स्वतःचा असा एक इतिहास आहे.

२ फेब्रुवारी १९३४ या दिवशी महात्मा गांधींची पायधूळ या बेकरी ला लागली होती. हो, त्यांच्या कून्नूर भेटीत गांधीजी या बेकरी मधेही आले होते.

आज जेव्हा मी या बेकरी बद्दल लिहायचं ठरवलं तेव्हा थोडी अधिक माहिती मिळावी म्हणून इंटरनेट वर चेक केलं तेव्हा ही माहिती मिळाली. इथल्या रेसिपीज सुद्धा या बेकरी इतक्याच जुन्या आहेत बरं का! पण फक्त रेसिपीज च नाही तर त्या काळातले काचेचे vintage bell jars पण अजूनही इथल्या काचेच्या shelves वर विराजमान आहेत.

हा bell jars चा फोटो मला या बेकरी च्या फेसबुक पेज वर सापडला.

विश्वयुद्ध काळातली दोन घड्याळंही आहेत इथे.बेकरीच्या उंबऱ्याला अजूनही त्या काळचे iron scrapers लागलेले आहेत. त्या काळचे लोक आत प्रवेश करताना आपल्या बुटांवरची माती, चिखल या iron scrapers वर स्वच्छ करत असत.

इथल्या ginger cookies खूप प्रसिद्ध आहेत. आणि मी तर असंही ऐकलं होतं (pck, of course) की पुण्यात चितळेंची बाकरवडी जशी अर्ध्या तासात संपते तशाच Crown Bakery च्या या ginger cookies देखील आपल्या डोळ्यांदेखत नाहीशा होतात…

तर अशा या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बेकरी च्या समोर मी त्या दिवशी उभी होते. घाबरतच आत शिरले आणि त्याहूनही घाबरत विचारलं,” Ginger cookies हैं क्या?” “खतम हो गयी ।” असं ऐकायला म्हणून मी मनाची पूर्ण तयारी केली होती. पण माझा प्रश्न संपायचा आत माझ्या समोर काउंटर वर ginger cookies चं एक पॅकेट अवतरलं. मी क्षणाचाही विलंब न करता ते तिथून उचललं. पैसे देऊन बाहेर निघताना माझ्या चेहेऱ्यावर ‘मोहीम फत्ते’ झाल्याचं विजयी हास्य झळकत होतं.

त्या संध्याकाळी जेव्हा माझ्या मैत्रिणींना मी ही बातमी सांगितली तेव्हा त्या सगळ्या आश्चर्यचकित झाल्या.. अचानक त्यांच्या डोळ्यांत माझ्या बद्दल आदर दिसायला लागला. हळूच एकीनी विचारलं,” पहाटेच जाऊन बसली होतीस का गं तिथे ..नंबर लावून?”

माझ्याकडून प्रेरणा घेत त्यातल्या दोघी तिघीनी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गडउतार व्हायचं ठरवलं आणि आमची मीटिंग बरखास्त झाली.

माझ्या Must see आणि Must buy च्या लिस्ट मधल्या एका नावा समोर मी tick केलं…Crown Bakery आणि तिथल्या Ginger cookies.

आता लिस्ट मधलं अजून एक नाव खुणावत होतं..’केत्ती’ गाव आणि तिथल्या hand embroidery केलेल्या वस्तू!!

माझ्याप्रमाणेच माझ्या मैत्रिणी पण त्यांचं त्यांचं pck गाठीला बांधून आल्या होत्या. एका मैत्रिणीकडून कळलं की केत्ती मधे काही ठिकाणी ‘made to order ‘ अशा एम्ब्रॉयडरी केलेल्या साड्या मिळतात. तिच्याकडे त्या दुकानांची नावं आणि पत्ते पण होते. म्हणजे आपण त्यांना जे डिझाइन आणि रंगसंगती सांगू त्याप्रमाणे त्या बायका आपल्याला साडीवर भरतकाम करून देतात..आणि त्यांचं कामही खूप नाजूक आणि सफाईदार असतं. खरं म्हणजे मला तिथल्या साड्यांपेक्षा इतर वस्तू बघायला जास्त आवडलं असतं..खास करून टेबल लिनन आणि बेड लिनन मधे मला जास्त इंटरेस्ट होता. पण एकच अडचण होती आणि ती म्हणजे- या सगळ्यासाठीची वेटिंग लिस्ट खूप लांब असते….अगदी चार पाच महिने सुद्धा!

त्यामुळे सर्वानुमते असं ठरलं की लवकरात लवकर केत्ती चं दर्शन घ्यायचं! आणि मग त्यादृष्टीनी आम्ही आमची प्लॅंनिंग करायला सुरुवात केली.

क्रमशः

माझी सैन्यगाथा (भाग २०)

आमच्या फौजी डिक्शनरी मधे एक शब्द आहे… pck …म्हणजे pre course knowledge .जेव्हा एखादा ऑफिसर कुठल्याही कोर्सला जायची तयारी करत असतो तेव्हा त्याच्या युनिट मधले आणि त्याच्या माहितीतले ऑफिसर्स त्याला आपापल्या परीनी मदत करतात. जे ऑफिसर्स तो कोर्स अटेंड करून आलेले असतात ते कोर्सशी संबंधित स्टडी मटेरियल, त्यांच्या पर्सनल नोट्स वगैरे पुरवतात. त्याचबरोबर काही जण कोर्स च्या दृष्टीनी महत्त्वाच्या अशा सूचना (guidelines) ही देतात. आणि याच सगळ्या ज्ञान वाटपाला pck अशा गोंडस नावानी संबोधलं जातं.

हे झालं ऑफिसर्स चं pck… पण अशाच तऱ्हेचं pre course knowledge आम्हां लेडीज मधेही असतं बरं का ! आणि आमच्या ज्ञान वाटपाची व्याप्ती ही खूप मोठी असते. म्हणजे अगदी त्या नवीन जागेच्या इतिहास भूगोला पासून जी सुरुवात होते ती अनेकविध विषयांचा आढावा घेऊन थांबते….

उदाहरणार्थ.. तिथे घरकामासाठी मेड्स मिळतात की नाही? आणि जर असल्या तर कोणत्या कामाचे अंदाजे किती पैसे घेतात? तिथल्या शाळा, किराणा सामान, भाजी वगैरे साठीचं मार्केट (काही ठिकाणी तर अगदी स्पेसिफिक दुकानांची नावं सुद्धा), ब्युटी पार्लर्स, डॉक्टर्स (खास करून paediatrician ), त्या गावातली आणि त्याच्या जवळपासची प्रेक्षणीय स्थळं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या तिथल्या खास , unique वस्तू आणि त्या मिळण्याची ठिकाणं.

विषयाचा आवाका खूप मोठा असल्यामुळे त्याचे साधारणपणे तीन पोटविभाग होऊ शकतात….

Must see

Must buy

Must do

यातल्या ‘must see’ मधे मुख्यत्वे करून त्या जागेच्या आसपास असलेल्या प्रेक्षणीय स्थळांचा समावेश असतो. आणि त्याचबरोबर काही ‘हटके’ ‘not so common’ टुरिस्ट स्पॉट्स पण असतात..उदाहरण च द्यायचं झालं तर ‘भूज’ च्या जवळ असलेलं ‘वीरांगना स्मारक’, दार्जिलिंग मधली ‘आवा आर्ट गॅलरी’, लिस्ट बरीच मोठी आहे हो !

‘Must buy’ मधे त्या ठिकाणी मिळणाऱ्या खास वस्तू, handicraft, कपडे, तिथले फेमस खाद्य पदार्थ वगैरे वगैरे समाविष्ट आहेत. म्हणजे जर कोणी जोधपूरला जाणार असेल तर तिथल्या खास लेहेरिया आणि शिवोरी साड्या अगदी रास्त दरात ज्या फॅक्टरी आउटलेट मधे मिळतात त्या माणसाचं नाव आणि फोन नंबर (तोही with reference बरं का), सप्तरंगी काचेचे कडे आणि बांगड्या साठी प्रसिध्द असलेलं घंटाघर मधलं ‘बिबाजी’ चं दुकान. दही कचोरी साठी पोकर स्वीट्स, जम्मू मधल्या ‘पहेलवान दी हट्टी’ मधे मिळणारा गाजर हलवा, औरंगाबाद मधल्या ‘तारा पान हाऊस’ चं जग प्रसिध्द ड्राय फ्रूट पान , पठाणकोट च्या ‘A1 बेकरी’ च्या कोकोनट कुकीज ….ही लिस्ट देखील पहिल्या लिस्ट सारखीच न संपणारी आहे. त्यामुळे आता तिसऱ्या विभागाकडे वळू या..

‘Must do ‘…..या सदरात material गोष्टींपेक्षा ‘live experiences ‘ बद्दल माहिती असते…म्हणजे ‘माउंट अबू ला जाणार असाल तर तिथला सूर्यास्त नक्की बघा’ किंवा ‘सिक्कीम ला गेल्यावर ‘बाबा हरभजन मंदिर’ ला जायचं अजिबात विसरू नका’ …या आणि अशा प्रकारच्या सूचना ऐकायला येतात.

आम्ही जेव्हा वेलिंग्टन ला यायला निघालो तेव्हा मला पण इतर लेडीज कडून अशा अगाध pck ची प्राप्ती झाली होती. आणि त्यामुळेच मी अगदी पूर्ण तयारीत होते…तिथल्या त्या एक वर्षाच्या कालावधीचा अगदी पुरेपूर उपयोग करून घ्यायला !

आमच्या युनिट मधले एक ऑफिसर वर्षंभरापूर्वीच तिकडे राहून आले होते. त्यांच्या बायको कडून मला बरीच माहिती मिळाली होती. त्यातला एक प्रॅक्टिकल आणि तितकाच महत्वाचा input म्हणजे… “साधारण एक वर्षांपासून ते दहा बारा वर्षांपर्यंतच्या मुला मुलींसाठी खूप सारी birthday gifts बरोबर घेऊन जा.. कारण तिकडे येणारे सगळे ऑफिसर्स समवयस्क असल्यामुळे सगळी बच्चे कंपनी पण एकाच वयोगटाची असते. त्यामुळे वर्षभरात खूप birthday पार्टीज ला जावं लागतं. आणि तिथे जवळपास कुठलंही गिफ्ट शॉप नाहीये, म्हणून तू आपली आधीच ती सोय करून ठेव.”

त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी तिचं पालन केलं, in fact मी तर गिफ्ट्स बरोबरच त्यांसाठी लागणारे रॅपिंग पेपर्स, सेलोटेप वगैरे पण आधीच स्टॉक करून ठेवले.

मला मिळालेल्या इतर माहिती मधे वेलिंग्टन, कून्नूर आणि जवळपासच्या काही जागांचा उल्लेख बऱ्याच जणींनी केला होता.

त्यात कून्नूर मधली ‘Crown Bakery’ त्याचप्रमाणे जवळच असलेल्या ‘केत्ती’ नावाच्या गावातल्या प्रसिद्ध ‘hand embroidery’ केलेल्या साड्या आणि टेबल लिनन यांचं नाव वारंवार आलं होतं. कोईम्बतूर जवळ असलेलं तिरुपुर हे गाव तर एखादं श्रद्धास्थान असल्यासारखंच वाटत होतं. अजूनही बऱ्याच जागा आणि बऱ्याच गोष्टी होत्या त्या लिस्ट मधे. लिहिण्याच्या ओघात त्यांचा उल्लेख होईलच म्हणा!

म्हणतात ना..की वैष्णोदेवी च्या यात्रेत जर तुम्ही देवीच्या दर्शनानंतर भैरवनाथाचं दर्शन घेतलं नाहीत तर तुमची यात्रा असफल होते….तसंच काहीसं आहे हे…म्हणजे वेलिंग्टन ला असताना त्या वर्षभरात जर तुम्ही वर उल्लेख केलेल्या जागांना भेट दिली नाहीत तर तुमचं तिथे राहाणं निरर्थक आहे !

इतकी सगळी माहिती मिळाल्यावर मला अगदी ‘रात्र थोडी सोंगं फार’ असं वाटायला लागलं होतं. त्यामुळे जरा स्थिरस्थावर झाल्यावर मी लिस्ट मधल्या पहिल्या जागेला भेट द्यायचं ठरवलं….कून्नूर मधली प्रसिध्द ‘Crown Bakery ‘.

क्रमशः